रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या विक्रीशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्या आणि डीलर्सना नव्या नियमांचा जितका फायदा होईल, तितकाच फायदा वाहनांची विक्री करणाऱ्या सर्वसामान्य लोकांनादेखील होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीचे नियम लागू केले आहेत.
या नवीन नियमांनुसार केवळ आरटीओ नोंदणीकृत डीलर्स कार विकणे आणि खरेदी करण्यासाठी अधिकृत असतील. प्री-ओन्ड कार मार्केटमध्ये पारदर्शकता आणणे आणि सामान्य लोकांचे फसवणुकीपासून होणारे नुकसान वाचवण्यासाठी हे नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. ट्रान्सफरमधील अडथळे, थर्ड पाटीसंबंधी दायित्वांशी संबंधित विवाद, डिफॉल्टर ठरवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आता केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या प्रकरण III मध्ये सुधारणा केली आहे, जेणेकरून प्री-ओन्ड कार बाजारासाठी नियामक इको-प्रणाली निर्माण करता येईल.
सर्वसामान्यांना कशाप्रकारे होईल फायदा?
सध्या कंपन्या किंवा कार डीलर वाहन विक्री केल्यानंतर वाहन हस्तांतरणासाठी कोऱ्या फॉर्मवर स्वाक्षरी घेतात. यानंतर ही कार कोणाला विकली जाते आणि जोपर्यंत ती विकली जात नाही, तोपर्यंत ती कोण वापरतो, याबाबत वाहन मालकाला कोणतीच कल्पना नसते. मात्र आता नवीन नियमानुसार वाहन विक्री केल्यानंतर डीलर किंवा कंपनी ऑनलाइन वाहन आपल्या नावावर करेल. म्हणजे आता वाहनाची विक्री होताच मालकाची कोणतीही जबाबदारी राहणार नाही. यामुळे आता कारमालकाला याचा फायदा होणार आहे.
नव्या नियमातील प्रमुख तरतुदी
1) नोंदणीकृत वाहनांच्या डीलर्ससाठी ऑथेंटिकेशन लागू करण्यात आले आहे.
2) नोंदणीकृत वाहन मालक आणि डीलर्स यांच्यात वाहन पुरवठ्याची माहिती देण्याची प्रक्रिया उघड करण्यात आली आहे.
3) नोंदणीकृत वाहने आपल्याकडे ठेवण्याबाबत डीलर्सचे अधिकार आणि कर्तव्येही स्पष्ट करण्यात आली आहेत.
4) डीलर्स आपल्या ताब्यातील वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र / वाहन फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण, नोंदणी प्रमाणपत्राची सत्य प्रत, एनओसी, मालकी हस्तांतरणासाठी अर्ज करू शकतात.
5) इलेक्ट्रॉनिक वाहनांचे देखभालसंबंधी ट्रिप रजिस्टर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये वाहन वापराचा संपूर्ण तपशील द्यावा लागणार आहे.
6) या नव्या नियमांमुळे वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या संदर्भात होणारी फसवणूक रोखता येणार आहे.