भारत सरकारने सर्व TV चॅनेल्सला आपल्या वाहिनीवर मृतदेहाचे फोटो, रक्ताने माखलेले फोटो अथवा कोणतेही त्रासदायक ठरणारे फुटेज दाखवू नये असा कडक सल्ला दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज, 9 जानेवारी रोजी सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना अपघात, मृत्यू आणि हिंसेच्या घटनांची माहिती देण्याबाबत ऍडव्हायजरी जारी केली आहे ज्यामध्ये महिला, मुले आणि वृद्ध यांच्यावरील हिंसाचाराचा समावेश आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, टीव्ही चॅनेलवर व्यक्तींच्या मृतदेहाचे फोटो, किंवा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तींचे फोटो/व्हिडिओ, स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांसह लोकांना बेदम मारहाण केल्याचा विडिओ, लहान मुलाचे सतत रडणे आणि ओरडणे यांसारखे व्हिडिओ दाखवले जातात. खरं तर फोटो अस्पष्ट करण्याची म्हणजेच ब्लर करण्याची कोणतीही खबरदारी न घेता ते आणखी भयानक पद्धतीने दाखवलं जात. अशा घटनांचे रिपोर्टींग करण्याची पद्धत प्रेक्षकांसाठी अप्रिय आणि त्रासदायक ठरत आहे. मंत्रालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की बहुतेक प्रकरणांमध्ये व्हिडिओ सोशल मीडियावरून घेतले जातात आणि एडिट न करताच प्रसारित केले जातात.
अशा प्रसारणाबद्दल चिंता व्यक्त करून आणि मोठ्या सार्वजनिक हिताचा विचार करून तसेच वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रेक्षकांच्या मनाचा विचार करून, मंत्रालयाने सर्व खाजगी टीव्ही चॅनेल्सना गुन्हे,अपघात आणि हिंसाचार, मृत्यू, गुन्हेगारी यांसंदर्भातील रिपोर्टिंग करताना त्रासदायक फोटो दाखवू नये अशा सूचना केल्या आहेत.