अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात सुसाट कमाई केली आहे. ‘वेड’ या चित्रपटाने नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चाही विक्रम मोडला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने 5.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कमाईच्या या आकड्यासह चित्रपटाने सुपरहिट ‘सैराट’चा विक्रम मोडला आहे.
पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची चांगली कमाई झाली. या कमाईत 27.50 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. आतापर्यंत या चित्रपटाने 33.42 कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या आठवड्यात वेडने 10 कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या आठवड्यात 12.75 कोटी रुपयांची कमाई झाली.
‘वेड’ची दुसऱ्या वीकेंडची कमाई-
शुक्रवार- 2.52 कोटी रुपये
शनिवार- 4.53 कोटी रुपये
रविवार- 5.70 कोटी रुपये
आतापर्यंतची एकूण कमाई- 33.42 कोटी रुपये
रितेश-जिनिलियाचा हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून हा चित्रपट हाऊसफुल आहे. समिक्षकांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातून अभिनेत्री जिनिलियाने बऱ्याच वर्षांनंतर कमबॅक केलं आहे. तर रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय.
वेड या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाशिवाय जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, विक्रम गायकवाड, खुशी हजारे आणि विनीत शर्मा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील जिनिलियाचा सहज अभिनय आणि प्रसन्न वावर प्रेक्षकांना खूपच भावला. प्रेमात माणूस वेडा होतो की जगावेगळी माणसं असं वेडं प्रेम करतात, अशा दोन्ही पद्धतीचं प्रेम ‘वेड’ चित्रपटात पहायला मिळतं.