शहरातील संजयनगर परिसरातील संपत चौकातील एका देशी दारूच्या दुकानाशेजारी बसलेल्या तरुणाचे तिघांनी अपहरण करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली.या तरुणाकडील 36 हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल चोरटय़ांनी लंपास केला. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामहरी बाळासाहेब चव्हाण (वय 33, रा. अहिल्यानगर, सांगली) याने फिर्याद दिली आहे.
रामहरी चव्हाण हा सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संपत चौकातील एका देशी दारूच्या दुकानात मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. बाहेर आल्यानंतर दुकानाच्या शेजारी असणाऱया कट्टय़ावर तो बसला. यावेळी तिघे त्याच्याजवळ आले. त्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने एका रिक्षात घालून पंचशीलनगर येथील रेल्वे गेटजवळ घेऊन गेले. तिघांमधील एकाने चाकूचा धाक दाखवून त्याला मारहाण करीत त्याच्या खिशातील 36 हजार रुपये आणि दोन मोबाईल काढून घेत त्याला रिक्षातून ढकलून देऊन पलायन केले. या घटनेनंतर चव्हाण याने संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.