निवडणूक आयोगाचा निर्णय काहीही असला तरी आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, उद्धव ठाकरेच आमचे पक्ष प्रमुख आहेत, आम्ही एकनिष्ठ आहोत, ही भावना घेऊन आज राज्यभरातून आलेले शेकडो शिवसैनिक मातोश्रीबाहेर एकवटले.महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाने ठाकरेंविरोधात निर्णय दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. तर आयोगाने शिवसेना पक्षाची ताकद शिंदेंच्या पारड्यात टाकल्यानंतर शिंदे गट अधिक आक्रमक झाला आहे. हजारो शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा एकदा अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे लढाईसाठी सज्ज झाल्याचं चित्र आहे. शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह गमावल्यानंतर पुढची लढाई कोणत्या मार्गाने लढायची,सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगासमोर कशी दाद मागायची यापेक्षाही अवसान गळालेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह कसा भरता येईल, हे मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. पुढील रणनीती काय हे ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात ओपन जीपवर भाषण केलं.
चोरांना गाडून छाताडावर उभा राहीन…
उद्धव ठाकरे यावेळी भाषणात म्हणाले, ‘ धनुष्यबाण चोरणारे मर्द असतील.. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या.. मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. हे मी सांगतो. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्हा आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभा राहील…
आदित्य-तेजस ठाकरेंची साथ
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पुत्र आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची साथ विशेषत्वाने दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर दौरे करत सक्रियता दाखवली. त्याच ताकतीने आजच्या महत्त्वाच्या प्रसंगी ते उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांसोबत हिंमतीने उभे असल्याचं चित्र दिसून आलं. मातोश्रीबाहेर जमलेल्या शेकडो शिवसैनिकांना शांततेचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. यावेळी तेजस ठाकरे यांचीही उपस्थिती होती.
30 ऑक्टोबर १९६८ साली हेच दृश्य
उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात ओपन जीपवर उभे राहून भाषण केलं. हेच चित्र ३० ऑक्टोबर 1968 साली दिसलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जीपच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. तीच आठवण यावेळी महाराष्ट्राला झाली.