माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या उद्या (23 फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकार निबंधक, बँक आणि कंपनीचे सदस्य, शेतकरी आणि अन्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्यांकडून हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले जात आहेत. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेच्या आणखी तीन संचालकांचे फोन नंबर ईडीकडून मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा बँकेच्या आजी माजी संचालकांची चौकशी
सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला चुकीच्या पद्धतीने पैसे पुरवल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा बँकेतून गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेतलेल्या ‘ब्रिक्स’ कंपनीला केलेला अर्थपुरवठाही वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि घोरपडे कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर जिल्हा बँकेवरही छापेमारी केली आहे. तसेच ‘ब्रिक्स’ला केलेल्या कर्जपुरवठ्याबद्दल बँकेच्या आजी-माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे या तिघांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेणाऱ्या ‘ब्रीक्स’ कंपनीच्या कर्जप्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. बँकेच्या मागील संचालक मंडळातील या कर्जप्रकरणाशी संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यापूर्वी, ईडीकडून कोल्हापूर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यापूर्वी, 11 जानेवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना 2013-14 मध्ये ‘ब्रीक्स’ कंपनीने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला होता. 2015 पर्यंत त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जपुरवठा घेतल्यानंतर 2015 नंतर त्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. या कालावधीत कंपनीने घेतलेल्या कर्जाबाबत ‘ईडी’चा आक्षेप आहे.
हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या जामीनाला विरोध
दुसरीकडे ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ईडीकडून मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यात आला आहे. ईडीने तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला कडाडून विरोध करताना म्हटले आहे की, त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेलं नाही. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर झालेले नाहीत. जामीन दिल्याने चौकशीवर परिणाम होईल, असेही ईडीने म्हटले आहे.