डंपरच्या धडकेत मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील मुलगा आणि वडील जागीच ठार झाले. विश्वास आण्णाप्पा कांबळे ( वय ५२ ) व मुलगा पंकज विश्वास कांबळे ( अंदाजे वय २२ ) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी येथील झेनीत स्टील समोर सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी , पंकज आणि वडील विश्वास हे मोपेड वरुन वाठारला निघाले होते. नागाव मधून ते पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आले. महामार्गावर आल्यानंतर अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झेनीत स्टील समोर त्यांच्या मोपेडला पाठीमागून येणाऱ्या डंपरने जोराची धडक दिली. या धडकेत पंकज व विश्वास हे दोघेही महामार्गावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेची माहिती समजताच मौजे वडगावात हळहळ व्यक्त होत होती. तसेच कांबळे यांचे कुटुंब अत्यंत साधे असुन गावात त्यांच्याबद्दल ऐक वेगळा आदर होता.