राज्यभरात आज दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झाली आहे. आज पहिल्याच दिवशीच्या पेपरला नाशिकमध्ये एक भीषण घटना घडली. परीक्षेला जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा भयंकर अपघात झाला. एका गॅसच्या ट्रकने या दोन विद्यार्थ्यांना धडक दिली. हे दोन्ही विद्यार्थी दुचाकीवरून परीक्षेसाठी जात होते. मात्र ट्रकने धडक दिल्याने त्यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला. तर विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सिन्नर तालुक्यातील आगस्टखिंड येथील हे विद्यार्थी होते. दर्शन आरोटे आणि शुभम बरकले अशी या दोघांची नावं आहे. हे दोन मित्र सकाळी दहावीच्या पेपरसाठी घरातून बाहेर पडले. अॅक्टिव्हा दुचाकीवरून दोघंही परीक्षेसाठी निघाले होते. मात्र समोरून येणाऱ्या HP गॅस ट्रकची आणि विद्यार्थ्यांच्या अॅक्टिव्हाची जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भयंकर होता की अॅक्टिव्हा गाडी पूर्णपणे ट्रकच्या खाली गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
आज दहावी बोर्डाचा पेपर असल्याने हे दोघंही मित्र घरून अभ्यास करून निघाले होते. दोघांनीही चांगल्या मार्कांनी पास होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण ऐनवेळी काळाने घाला घातला. दोघे मित्र जनता विद्यालय पांढुर्ली येथे पेपर देण्यासाठी जात होते. गावातून काही अंतरवर गेल्यानंतर डीएड कॉलेजसमोर त्यांची अॅक्टिव्हा आणि गॅस ट्रकची जोरदार धडक झाली. या दुर्दैवी घटनेमुळे बरकले आणि आरोटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर गावावर शोककळा पसरली आहे.
राज्यभरातील सुमारे पाच हजार केंद्रांवर आज दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. राज्य सरकारकडून यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. मात्र चंद्रपूरमध्ये भयंकर घटना घडली. येथील परीक्षा केंद्रावर मधमाशांनीच हल्ला चढवला. यात तीन विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले. चंद्रपूर जिल्ह्यात पेलोरा येथील परीक्षा केंद्रावर ही घटना घडली.