विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ अशा शब्दात करणारे खासदार संजय राऊत यांच्या निषेध नोंदवण्यासाठी काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या शिवसैनिकांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी शिवसैनिकांनी राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ हे चोरमंडळ आहे असा उल्लेख केला होता. त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राऊत यांच्या या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, इचलकरंजी शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे, झाकीर भालदार यांच्यासह शिवसैनिक अतिग्रे फाटा येथे जमले होते.
जिल्ह्यात फिरू देणार नाही याचवेळी कोल्हापूरहून इचलकरंजीला शिवगर्जना सभेसाठी खासदार संजय राऊत जाणार होते. त्यांच्यासमोर काळे झेंडे दाखवण्याची तयारी शिवसैनिकांनी केली होती. मात्र राऊत तेथे येण्यापूर्वीच हातंकणगले पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी शिवसैनिकांनी राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभेतील आमदारांच्या मतावर खासदार झालेल्या राऊत यांनी जीभ सांभाळून वक्तव्य करावे. अन्यथा त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा रवींद्र माने यांनी दिला.