Monday, March 4, 2024
Homeसांगलीजुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा सांगलीत विराट मोर्चा

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा सांगलीत विराट मोर्चा

सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी जुनी पेन्शन योजनाच हवी. गेली 17 वर्षे शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी संघर्ष करीत आहेत.आज सांगलीत विराट मोर्चाद्वारे जुन्या पेन्शनची मागणी करण्यात आली. या मोर्चात 20 हजारांहून अधिक कर्मचारी सहकुटुंब मोर्चात सहभागी झाले होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चा समन्वय समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पाटील म्हणाले, ”राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, झारखंड व हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार आल्यानंतर तातडीने जुनी पेन्शन योजना लागू केली. या राज्यांचा जीडीपी कमी असूनही त्यांनी जुन्या पेन्शनचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचा जीडीपी चांगला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याने जुनी पेन्शन लागू केलीच पाहिजे. राज्यभर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. मंगळवारपासून राज्यातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. शासनाने जुन्या पेन्शनचा निर्णय घेतला नाही, तर हा मोर्चा केवळ ट्रेलर असून, 2024 चा पिक्चर बाकी आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार अरुण लाड, माजी महापौर सुरेश पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी आमदार भगवान साळुंखे, रोहित पाटील, पी. एन. काळे, अरुण खरमाटे, प्रा. एन. डी. बिरनाळे, बाबा लाड, अमोल शिंदे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

मोर्चाचे पहिले टोक राजवाडा चौक व शेवटचे टोक कर्मवीर पुतळ्याजवळ होते. मोर्चात ‘एकच मिशन – जुनी पेन्शन’ मजकुराच्या टोप्या घातलेले हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. भर उन्हात जुनी पेन्शनसंदर्भात असंख्य घोषवाक्यांचे फलक घेऊन शासनास इशारे देत होते. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीचे निवेदन निमंत्रक पृथ्वीराज पाटील, आमदार विक्रम सावंत, अमोल शिंदे, प्रा. एन. डी. बिरनाळे, राजेंद्र नागरगोजे, अरविंद जैनापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -