‘पुष्पा’ चित्रपटामुळे घराघरात आणि मनामनात स्थान मिळवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या चित्रपटाने तिला इतकी प्रसिद्धी दिली ती तिला चित्रपटातील पात्राच्या नावाने म्हणजेच ‘श्रीवल्ली’ म्हणूनच नवी ओळख मिळाली.
रश्मिका अत्यंत ताकदीची आणि नव्या दमाची अभिनेत्री आहे. ती तमिळ, तेलगू आणि अन्य दाक्षिणात्य भाषांमध्येही काम करते विशेष म्हणजे ‘गुड बाय’ चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्येही पदार्पण केलं. त्यामुळे जगभरात चाहते असणारी ही अभिनेत्री आता चक्क मराठीकडे वळली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल खरं.. दाक्षिणात्य श्रीवल्लीला आपल्या मराठमोळ्या लावणीची भुरळ पडली आहे. लवकरच तिची ही दिलखेचक अदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
सध्या ‘झी’ गौरव पुरस्कार सोहळ्याचे सर्वांनाच वेध लागले आहेत. यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२३ सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या ४ भाषांमध्ये काम करत असलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक श्रीवल्ली ‘रश्मिका मंदान्ना’. जी आपल्या सर्वांना अप्रतिम लावणीवर ठेका धरताना दिसणार आहे.
विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे, सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसेल. नुकतेच या लावणीचे चित्रीकरण झाले. येत्या रविवार २६ मार्च ला सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात ही लावणी पाहता येईल. मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ 2023 लवकरच होणार आहे, या सोहळ्याचे वेध सध्या कलाकारांसह प्रेक्षकांनाही लागले आहेत.
यंदाच्या सोहळ्यात खूप काही खास असणार आहे, विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरही या मंचावर आपला डान्स सादर करणार आहेत. याशिवाय विनोदाची आतिषबाजी हा तर या सोहळ्याचा मुख्य भाग असतोच. पण यंदा झी चित्रगौरव च्या मंचावर येणार श्रीवल्ली रश्मिका मंदाना येणार असल्याने प्रचंड चर्चा झाली आहे.