3 एप्रिलपर्यंत ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार वारे, गडगडाट आणि वीज पडण्याची शक्यता आहे. इथं मुसळधार पाऊसही पडू शकतो.पुढील काही दिवस संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये.
सध्या भारतात अफगाणिस्तान आणि इराणमधून उष्णतेची लाट येण्यास उशीर झाला आहे. आयएमडीनं राजस्थान आणि जम्मू-काश्मीरसह 17 राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यात दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील राज्यांचाही समावेश आहे. हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पूर्व राजस्थानमध्ये दोन दिवस हवामानात बदल जाणवणार आहे.
IMD च्या माहितीनुसार, पुढील दोन आठवडे देशात उष्णतेची लाट असणार नाहीये. यामागं दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स हे मुख्य कारण आहे. IMD नं पुढील दोन दिवस संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पाऊस आणि अनेक राज्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज वर्तवलाय.
हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. यासोबतच पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणामध्येही पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. कर्नाटकचा काही भाग वगळता दक्षिण भारतातील सर्व राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.