चैत्र यात्रेसाठी जोतिबाच्या दर्शनासाठी असलेल्या दोघा युवकांच्या डोक्यात कमानीचे दगड पडल्याने ते गंभीर जखमी झाले. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता काळभैरी समोरील कमानीवर सासनकाठी आदळल्याने हि दुर्घटना घडली. सुरज हनमंत उधाळे (वय २७), अथर्व विजय मोहिते (वय १८ रा. दोघे बहे ता. वाळवा, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. समजलेली माहिती अशी, बहे (ता. वाळवा जि. सांगली) येथील दहा ते पंधरा युवक जोतिबाच्या दर्शनासाठी आले होते.
दर्शन करून ते यमाई देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी एक सासनकाठी पुढे गेली, ती काठी मोठी असल्याने कमानीला घासली. त्यामुळे कमानीचा दगड निखळून सुरज उधाळे व अथर्व मोहिते यांच्या डोक्यात पडले. दोघेही गंभीर जखमी झाले. डोक्यातून रक्त येऊ लागल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून प्राथमिक उपचार केंद्रात प्रथमोपचार करून पुन्हा सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यातील गंभीर जखमी अथर्व मोहिते यास कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.