श्रीराम फौंडेशन हातकणंगले यांच्या वतीने श्रीराम नवमी आणि श्री हनुमान जयंतीचे निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान गुरुवार ता. २० एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता हातकणंगले येथे आयोजित केले आहे. या स्पर्धा कोल्हापूर जिल्हा व राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने होणार असून या मैदानांत साठहून अधिक कुस्त्यांचा फड रंगणार आहे, त्यासाठी सुमारे पाच लाखाची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे (गंगावेस तालीम, कोल्हापूर) आणि पै. योगेश पवार (छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल, पारनेर) यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे. तर पै. श्रीमंत भोसले (व्यंकोबा मैदान, इचलकरंजी ) आणि पै. भागवत निरगुडे (पुणे) यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी कुस्ती रंगणार आहे. याशिवाय इतर एकूण साठ कुस्त्यांचा फड या मैदानात रंगणार आहे.
प्रथम क्रमांकासाठी एक लाख एकवीस हजार तर द्वितीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार रूपयांचे रोख पारितोषिक असून एकूण पाच लाखाची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रेक्षकांसाठी सुमारे चार हजार प्रेक्षक बसतील इतकी गॅलरी उभारण्यांत आली असून इतर सर्व तयारी पूर्ण झाल्याचे श्रीराम फौंडेशनच्या संयोजकांनी दिली.








