सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म इन्स्टावरून अल्पवयीन मुलीशी ओळख केल्यानंतर ब्लॅकमेल करून तीनवेळा अत्याचार केल्याप्रकरणी कोल्हापुरातील तरुणाला साताऱ्यात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संकेत मेंगणे (वय 19, रा. मेंगणेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, सध्या रा. शिक्रापूर, जि. पुणे) असे सातारा पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित पीडित मुलगी 14 वर्षाची असून सध्या नववीत शिकत आहे. याप्रकरणी त्या तरुणावर सातारमधील शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आणि संकेतची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संकेत हा पीडित मुलीला भेटण्यासाठी तिच्या शाळेजवळ आला. यावेळी त्याने त्या मुलीचे फोटो काढले होते. फोटो काढून तो पुण्याला गेल्यानंतर पुन्हा 13 एप्रिल रोजी साताऱ्यात गेला. यावेळी त्याने त्या मुलीला तुझे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देऊन तिला शहरातील एका हाॅटेलमध्ये नेत अत्याचार केला. त्यानंतर त्याने आणखी दोन ठिकाणी नेत अत्याचार करत पुण्याला गेला.
सलग अत्याचार केल्याने घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने मुलीकडून माहिती घेत पोलिस स्टेशनला धाव घेतली. आईने मुलीसोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी संकेत मेंगणेवर ‘पाॅक्सो’अन्वये गुन्हा दाखल केला. शाहूपुरी पोलिसांनी शिक्रापूरमधून पोलिसांनी संकेतला ताब्यात घेत अटक केली.
दरम्यान, महिलेच्या असहाय्यतेचा फायदा डॉक्टर कडून विवस्त्र व्हिडिओ करण्याचा प्रकार कोल्हापुरात घडला होता. महिला पीडिताने तक्रार दिल्यानंतर डॉ. प्रशांत लक्ष्मण कनुजे या संशयिताविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला डाॅक्टर शिरोळ तालुक्यामधील आहे. विवाहितेच्या आर्थिक असहाय्यतेचा गैरफायदा घेत शिरोळ तालुक्यातील एका डॉक्टराने तिला गोकुळ शिरगाव (ता करवीर) येथील एका हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडीओ तयार करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे पीडितेकडून पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.