इचलकरंजी, येथील साईट नं. १०२ परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाचजणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पाच हजाराची रोकड आणि दोन दुचाकी असा ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील सहकारनगर साईट नं. १०२ मध्ये गणेश बागडे याच्या पत्र्याच्या शेडमध्ये तीनपानी जुगार सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी रात्री या शेडवर छापा टाकला असता पाचजण तीनपानी जुगार खेळताना मिळून आले. जुगार खेळणाऱ्या ऋतिक भारत गवळी (वय १९), रामा दिपक चांदणे (वय १९), संतोष मिठू ढावारे (वय ३५), सागर महादेव कांबळे (वय ३०) आणि दशरथ पोपट अडसुळे (वय ३२ सर्व रा. साईट नं. १०२) या पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत रोख ५ हजार रुपये आणि २ दुचाकी असा ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शेड मालक बागडे याच्यासह सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.