इचलकरंजी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार दि. ६ रोजी पुकारलेल्या इचलकरंजी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वच सर्वच नागरिक, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, बसस्थानक, रिक्षा, वडाप व मालवाहतूक पूर्णतः बंद ठेवून कडकडीत बंद पाळून अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेध व्यक्त केला.
या निषेध मोर्चात हजारोंच्या संख्येने सर्वच समाजबांधव सहभागी झाले होते. त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. भगव्या टोप्या, भगवा ध्वज आणि काळा स्कार्फ घातलेले युवक, युवती आणि महिला मोर्चात लक्ष वेधून घेत होत्या. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे संपूर्ण राज्यभरात संतप्त पडसाद उमटत असून त्याच अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली होती.
मुस्लिम समाज, आवाडे जनता बँकेतर्फे पाण्याची सोय मोर्चा दरम्यान समस्त मुस्लिम समाज कोअर कमिटी आणि कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या वतीने आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर मोर्चा संपल्यानंतर रस्त्यावर व रस्त्याकडेला टाकण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्या गोळा करुन स्वच्छताही करण्यात आली.
सकाळी १० वाजता राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन निषेध मोर्चास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर आरक्षण देण्यास विलंब केला जात असल्याबद्दल राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रमुख मार्गावरुन मोर्चा शिवतीर्थ येथे आला. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन प्रेरणामंत्राचा जप करण्यात आला. तेथून हा मोर्चा कॉ. के. एल. मलाबादे चौक ते महात्मा गांधी पुतळा येथे आल्यानंतर त्याठिकाणी नायब तहसिलदार मनोज ऐतवडे यांना मागण्यांचे निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २ पोलिस उपअधिक्षक, ४ पोलिस निरिक्षक, ३२ सहाय्यक पोलिस निरिक्षक व उपनिरिक्षक, २५२ महिला व पुरुष कर्मचारी, ३ स्ट्रायकिंग फोर्स, गृहरक्षक दलाचे जवान, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी आणि निर्भया पथकाचा समावेश होता.
सांगताप्रसंगी पुंडलिकभाऊ जाधव यांनी मराठा समाजाचे गेल्या पाच दशकांपासून आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन सुरु आहे. आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर विविध शहरात ५८ मुकमोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
आरक्षण न मिळाल्यास एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही. म्हणूनच मुख्यमंत्री व अन्य नेतेमंडळींनी आपले राजकीय लागेबांधे व मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात
बतीव्र स्वरुपाचे सहकुटुंब आंदोलन छेडले जाईल. त्यालाही समाजबांधवांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.
या आंदोलनात विविध समाज बांधवांसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, रिक्षा स्टॉप, वाहतूक संघटना, सार्वजनिक मंडळे आदींनी आपला पाठींबा दर्शवत मोर्चात सहभाग घेतला.
राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारातील सर्वच बस फेऱ्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुमारे ११ हजार ८१७ किलोमीटरच्या २३८ बस फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे सुमारे साडेचार लाख रुपयांचा महसुल बुडाला. येथील बसस्थानकावर येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, मिरज व नजीकच्या सीमावर्ती भागातून येणारी एकही एस. टी. न आल्याने त्याचाही फटका सोसावा लागला. आंदोलनामुळे बस, रिक्षा, वडाप आदी वाहतूक बंद राहिल्याने बाहेरगावाहून आलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांना विशेषत: महिला व लहानमुलांना पायपीट करावी लागली.








