Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंगकृष्णाकाठचे पाणी : वातावरण तापले

कृष्णाकाठचे पाणी : वातावरण तापले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यात सर्वाधिक कमी पर्जन्यमान यंदा नोंदवल्याने जिल्हा एकीकडे दुष्काळाचे चटके सहन करत असतानाच कोयना धरणाच्या पाण्यामुळे बारमाही हरित असलेला कृष्णाकाठही मानवनिर्मित जलटंचाईला सामोरा जात आहे. याचे पडसाद सध्या राजकीय पटलावर उमटत असून पाण्यावरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. कोयना सातारा जिल्ह्यात असले तरी कोयनेतून पाणी सोडण्यामध्ये सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा हस्तक्षेप होत असल्याची उघड चर्चा सुरू असताना सांगलीचे पालकमंत्री सांगलीला हक्काचे पाणी का मिळवू शकत नाहीत असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

ऐन गणेशोत्सवावेळी विसर्जनादरम्यान सांगलीजवळ कृष्णा कोरडी पडली होती. आताही गेल्या आठवड्यापासून कृष्णा कोरडी पडली आहे. पाणी कधी सोडायचे, कधी बंद करायचे याचे वेळापत्रक धरण व्यवस्थापनाकडे आहे. जेणेकरून नदी बारमाही वाहती राहील याची दक्षता दरवर्षी घेण्यात येते. यंदा कोयना धरणातील ८९ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी कोयना शंभर टक्के म्हणजे १०५ टीएमसी भरले होते. यंदा पावसाने ओढ दिल्याने कमी पाणीसाठा झाला असला तरी एकदमच पाणीबाणी स्थिती निर्माण झालेली नाही. तरीसुध्दा ऐन सणासुदीच्या काळात आणि ज्या वेळी पिकांना पाण्याची जास्त गरज भासते अशावेळी जर नदी कोरडी पडली तर त्याचा फटका सर्वच घटकांना बसतो. गेल्या आठवड्यापासून कृष्णा कोरडी ठाक पडली आहे. याचे परिणाम केवळ शेतीपिकावरच नव्हे तर अनेक गावच्या पाणीपुरवठ्यावरही झाला आहे.

पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून सांगली पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची मागणी केली असतानाही पाणी का सोडले जात नाही हेच उघड गुंपित आहे. याबाबत आमदार अरूण लाड यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची संपर्क साधला होता. मात्र, जनरेटा तीव्र होताच शुक्रवारी पाणी सोडण्यात आले. मात्र तेही कमी प्रमाणात असल्याने सोडलेले पाणी येण्यास चार दिवसांचा अवधी लागणार आहे. याच कालावधीत महापालिकेच्या नेहमीच्या बेजबाबदार वागण्यामुळे शेरीनाल्याचे दुषित पाणी नदीत मिसळत असून याच पाण्यावर सांगलीकरांना दसरा साजरा करावा लागला.

कोयनेच्या पाण्यावर ताकारी, टेंभू, आरफळ या सिंचन योजना चालविल्या जातात. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, तासगाव, खानापूर, आटपाडी, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तालुययाना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत असून हा सर्व भाग अल्प पावसाने अडचणीत आला असताना पाणी सोडण्याच्या नियोजन शून्य कारभारामुळे उभी पिके अडचणीत तर आहेतच, पण याचबरोबर लाखो रूपयांची शेतकर्‍यांची गुंतवणूकही बेभरवशाची झाली आहे. नदीकाठ हा उस शेतीने समृध्द मानला जातो. याच भागात साखर कारखानदारीही फोफावली असून पाण्यामुळे कारखानेही अडचणीत येण्याची शययता नाकारता येणार नाही. याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होउ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -