राज्यातील विविध भागात सध्या पाऊस (Rain) पडत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, महाराष्ट्रातील (Maharashtra) पावसाबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Pnajabrao dakh) यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जून पासून ते 15 जून पर्यंत राज्यात भाग बदलत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तसेच त्यांनी सध्या पावसाचा कुठलाच खंड पडणार नसल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.
राज्यात 22 जून पर्यंत पाऊस सुरू राहणार
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 22 जून पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडतच राहणार आहे. आज एका तालुक्यात तर उद्या दुसऱ्या तालुक्यात अशा तऱ्हेने पाऊस पडत राहणार असल्याचे पंजाबराव डख म्हणाले. 15 जूनपासून ते 17 जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे. परंतू, या कालावधीतही विदर्भात पाऊस सुरूच राहणार आहे. आजपासून 15 जून पर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.
ओढे, नाले भरुन वाहणार
पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अगदी ओढे, नाले भरुन वाहतील अशा स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे. विदर्भातहीआता पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच 20 तारखेपर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांच्या देखील पेरण्या सुरू होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भात 12 जून ते 22 जून या दहा दिवसांच्या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी व्यक्त केली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीप्रमाणं आगामी तीन-चार दिवस राज्यातील सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, अकोला, हिंगोली, वाशिम, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
या जिल्ह्यांमध्ये खूपच जोरदार पावसाची शक्यता
डखांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, सोलापूर, धाराशिव, सांगली आणि बीड या जिल्ह्यात खूपच जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यातील काही छोटी मोठी तळे देखील या कालावधीत भरु शकतात असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.