देशातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला तर काही भागांत अद्यापही पावसाची प्रतिक्षाच आहे. त्यातच आता पुढील पाच दिवस पश्चिम किनारपट्टीला पाऊस झोडपणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोमवार ते शुक्रवारपर्यंत देशाच्या पश्चिम किनारपट्टी प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातही पावसाची स्थिती म्हणावी तशी चांगली नाही. काही भागांत पावसाची प्रतिक्षा कायम आहे. राज्यातील कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, गोवा, आणि अरुणाचल प्रदेशातील घाट भागात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण किनारपट्टीअंतर्गत कर्नाटक, केरळ याठिकाणी देखील अतिमुसळधार पावसाची शक्यताही भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
काही भागांत ‘रेड अलर्ट’
गुजरातमध्ये पुढील 24 तासांत ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून, बहुतांशी भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. सौराष्ट्राचा दक्षिण भाग, कच्छचा मध्य भाग, गुजरात राज्याच्या दक्षिणेकडील भागांत अतिवृष्टीमुळे कमी ते मध्यम स्वरूपाच्या पुराची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
अतिमुसळधार पावसाचा अंदाज
मंगळवारी अंदमान आणि निकोबार बेट, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम याठिकाणी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.