Friday, October 18, 2024
Homeइचलकरंजीपाणी प्रश्नांसाठी आयुक्तांचे सहकार्य नाही : आमदार प्रकाश आवाडे 

पाणी प्रश्नांसाठी आयुक्तांचे सहकार्य नाही : आमदार प्रकाश आवाडे 

इचलकरंजी शहराच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असताना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे हे कोणतेही सहकार्य न करता सतत दुर्लक्षच करत आहे. त्यामुळे पाणी प्रश्‍नाचे गांभिर्य नसणार्‍या दिवटे यांना तातडीने बडतर्फ करा, अशी थेट मागणी आमदार प्रकाश आवाडे शनिवारी कोल्हापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीचा पिण्याच्या पाणी प्रश्‍नावर जोरदार भाष्य करत महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नसल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. ही पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे.

त्याच अनुषंगाने मजरेवाडी येथील कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेचे गळतीचे शुक्लकाष्ठ संपावे यासाठी राज्य शासनाकडून 5.2 किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलण्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करुन आणून दिला. मात्र या कामात आयुक्तांकडून सातत्याने असहकार्याची भूमिका घेतली जात आहे.

 

 

त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून इचलकरंजी शहरात 99 ठिकाणी शुध्द पेयजल प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाकडून 4 कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला दिला. मात्र या कामातही आयुक्तांकडून चालढकल केली जात असून अद्यापही हे पेयजल प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आलेले नाहीत. कृष्णा योजनेचे बळकटीकरण करुन शहराला योग्य पध्दतीने पाणी पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजीत 7 नवीन जलकुंभ उभारण्यासाठी मंजूरी दिली आहे.

 

 

पण त्या संदर्भातील प्रस्ताव अद्यापही महानगरपालिकेकडून पाठविला जात नाही. पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असतानाही सातत्याने आयुक्तांकडून असहकार्याची भूमिका घेतली जात आहे. याशिवाय मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी माझ्या मागणीवरुन कृष्णा व पंचगंगा योजनेच्या विद्युत मोटारी बदलण्यासह तत्सम कामांसाठी 4 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनीही कोणती कामे करावयाची त्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र अद्याप त्या संदर्भात काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. निधीची उपलब्धता असतानाही आयुक्तांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे कामांना खीळ बसत आहे. त्यामुळे आयुक्तांना तातडीने बडतर्फ करा अथवा मी सभात्याग करतो, असा इशारा आमदार आवाडे यांनी दिला.

 

शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण शासनाकडून निधीची उपलब्धता करुन देत असताना आयुक्तांकडून मात्र असहकार्याची भूमिका घेत कामे खोळंबून ठेवली जात आहेत. जर पिण्याच्या पाणी प्रश्‍नाचे गांभिर्य त्यांना कळत नसेल तर ताबडतोब त्यांना बडतर्फ या मागणीवर आमदार आवाडे ठाम होते. याशिवाय आमदार आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक तो स्टाफ भरण्यासह आवश्यक यंत्रसामग्री व तातडीने एमआरआय मशिन उपलब्ध करुन द्यावे, कबनूरसह आवश्यक त्याठिकाणी फ्लाय ओव्हर करावेत, कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून तयार असून ते अद्यापही वापरात नाही ते तातडीने सुरु करावे अशी

मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -