जळगाव कारागृहात क्षुल्लक कारणामुळे खूनी थरार रंगला आहे. या कारागृहात दोन कैद्यांमध्ये दुपारी भांडण झालं. त्याचा राग मनात ठेवून एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर मध्यरात्री हल्ला केला. त्यात या कैद्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
जळगावच्या कारागृहात मध्यरात्री खूनी थरार पाहायला मिळाला. पहाटे दीड वाजेच्या सुमारास एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे हा कैदी गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असतानाच या कैद्याने जीव सोडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मोहसीन असगर खान (वय 34) असं मृत कैद्याचं नाव आहे. भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र खरात यांचा हत्याकांडातील तो आरोपी आहे. त्याचाच तुरुंगात खून करण्यात आल्याने पोलीसही हादरून गेले आहेत. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या हत्याकांडातील आरोपीची हत्या करण्यात आली आहे. जळगाव जेलमध्ये दोन कैद्यांमध्ये अंतर्गत वाद झाला. त्यात एकाची हत्या करण्यात आली आहे. भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात (वय 55) यांची 7 ऑक्टोबर 2019 रोजी भुसावळमध्ये अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती.
एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या भयंकर हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचे बळी गेल्याने परिसर हादरला होता. पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना जळगाव कारागृहात ठेवण्यात आलं होतं.
दुपारी भांडले, रात्री हल्ला
यातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचं तुरुंगातील दुसऱ्या कैद्याशी काल दुपारी भांडण झालं. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. त्याचा राग मनात ठेवून दुसऱ्या आरोपीने आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास मोहसीन असगर खानवर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.
मयत असगर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी तुरुंगात धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. या हत्याकांडात दुसरा काही अँगल आहे का याचा तपास पोलीस करत आहे. मात्र, या घटनेमुळे भुसावळमधील गँगवार आता जेलमध्ये पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.