गेल्यावर्षीच्या मध्यात, दिवाळीपूर्वी मराठा आरक्षणासाठी पुन्हा चळवळ उभारण्यात आली. लाखोंच्या संख्येने मराठे एकत्रित आले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटीतही आमरण उपोषणं झालीत. वाशीपर्यंत, मुबंईच्या वेशीवर मोर्चा धडकला. त्यानंतर सरकार नरमले, कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ लागली. तर सगे-सोयरे अध्यादेश काढण्यात आला. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मराठवाड्यात शांतता रॅली काढली आहे. या रॅलीदरम्यान त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्ला चढवला आहे.
मराठा आरक्षणाचा गेम होणार का?
सरकार मराठा आरक्षणाचा गेम तर करत नाही ना? या माध्यमांच्या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी थेट उत्तर दिले. आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे. फक्त सगे सोयरेची अंमलबजावणी झाली नाही. तेच आमचं म्हणणं आहे की लवकर अंमलबजावणी करा. 13 तारखेपर्यत वाटत नाही की सरकार आमचा गेम करणार.
आम्ही राजकीय पोळी भाजू देणार नाही
सत्ताधारी, विरोधक यांना गांभीर्य नाही. त्यांना कधीही गरीबांशी देणं घेणं नाही. त्यांना ओबीसी आणि मराठ्यांशी देणे-घेणं नाही. सगेसोयरे अध्यादेशाप्रकरणात ओबीसी नेत्यांनी विरोध केला. मराठा नेते बोलत नाही. कुणीही कितीही म्हटलं की राज्य या मुद्यांमुळे पेटत आहे, कुणीही कितीही स्वप्न पाहिले तरी आम्ही राज्य पेटू देत नाही. महाविकास आघाडी आणि महायुती, सत्ताधारी आणि विरोधकांना या मुद्यावरुन आम्ही राजकीय पोळी भाजू देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल
ओबीसीवर अन्याय होणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्यांनी असंही म्हणावं मराठ्यांवर अन्याय होणार नाही. 10 टक्के आरक्षण टिकणार नाही. ते आम्हाला मान्य नाही, मराठा मागास सिद्ध झाला आहे. मग आम्हाला 50 टक्क्यांच्यावर कशाला नेऊन घालता, आमची जात जे मागेल ते आम्ही घेऊ, कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार नाही. बाकीच्यांनी बोगस आरक्षण घेतलेलं आहे, भुजबळ चोरून आरक्षण खातात, त्यांनी आमच्या विरोधात विनाकारण ओबीसी नेते उभे केले आहेत. मुख्यमंत्री देखील आमचे प्रमाणपत्र रद्द करणार नाही, आम्ही आतापर्यंत संयम ठेवला आम्हीही आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी बघू, असे जरांगे पाटील म्हणाले.
ओबीसी नेत्यांना सुनावले
आम्ही भुजबळ यांच्या विरोधात बोलतो मग बाकीचे ओबीसी नेते का फुकट भांडण ओढून घेतात बाकीचे ओबीसी नेते विष पेरत नाही म्हणून आम्ही त्यांना बोलत नाही,भुजबळ धनगर समाजाच्या बाजूने बोलत नाही तरीही तुम्ही त्याचं का ऐकता सरकारने आम्हाला ढकलायची चूक करू नये. आरक्षणासाठी मराठा नेते ओबीसी नेत्यांसारखे एकत्र येत नाही हीच आमची शोकांतिका त्यांनी व्यक्त केली.