Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रवारणा धरणातून विसर्ग आणखी कमी

वारणा धरणातून विसर्ग आणखी कमी

जिल्ह्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून दुसऱ्या दिवशीही विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला.

 

यामुळे सोयाबीन, भुईमूग, भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

 

जिल्ह्यातील वाळवा, पलूस, मिरज आणि शिराळा तालुक्यांत अतिवृष्टी झाली तर कडेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात पाणी साचले होते. तर कृष्णा आणि वारणा नदीकाठची पिके पाण्याखाली होती. यामुळे भात, सोयाबीन, भुईमूग यासह अन्य पिकांचे नुकसान झाले.

 

सध्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी कमी होत असली तरी, अजूनही पिके पाण्याखालीच आहेत. ज्या भागात पावसाचे पाणी आणि पिकातील पाणी कमी झाले आहे, त्या भागातील बाधित पिकांचे पंचनामे करावेत, अशी माहिती शेतकरी करू लागले आहेत.

 

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ७१ मिलिमीटर पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. रविवारपेक्षा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला होता. सोमवारी (ता. २९) वारणा धरणातून १२२८५ क्युसेकने विसर्ग सुरू होता. मंगळवारी (ता. ३०) सकाळी विसर्ग ४१९३ क्युसेकने घटवला असून सध्या ८०९२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

 

कृष्णेच्या पातळीत वाढ शक्य

 

कोयना धरणातून ३२,१०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी (ता. ३०) दुपारनंतर पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातून विसर्गात १० हजार क्युसेकने वाढ करून तो ४२,१०० क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सांगली येथील आयर्विन पुलाजवळ ३८.११ फूट पाणी पातळी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -