Monday, September 16, 2024
Homeकोल्हापूरपंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर; पाणी पातळी 31 फुटांवर, राधानगरी धरणाच्या स्वयंचलीत दरवाजांची काय...

पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर; पाणी पातळी 31 फुटांवर, राधानगरी धरणाच्या स्वयंचलीत दरवाजांची काय स्थिती?

कोल्हापूर : वेधशाळेने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार घाटमाथ्यावर गेल्या ४८ तासांत धुवाधार पाऊस झाला.

 

जिल्ह्यात २४ तासांत ३२.९ मिमी पाऊस पडला. यामध्ये राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी झाली व २४ तासांत ८०.२ मिमी पावसाची नोंद झाली.

 

राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) ४ स्वयंचलीत दरवाजे कालच खुले झाले असून, त्यातून ७ हजार २१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुक्तपाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाणही वाढल्याने पंचगंगेची (Panchganga River) पाणी पातळी १२ तासांत ५ फुटांनी वाढली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा नदीचे पाणी पात्राबाहेर आले. जिल्ह्यातील २३ बंधारे पाण्याखाली गेले असून, नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, काल शहरात संततधार पावसामुळे आदित्य कॉर्नर आणि सिद्धार्थनगर येथे झाड पडण्याच्या घटना घडल्या.

 

श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ थांबला आणि दोन दिवसांपासून पावसाने संततधार सुरू केली. शहर आणि परिसरात दिवसभर पावसाचा जोर राहिला. त्यामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले. सखल भागात पाणी साचले. रस्त्यावरील खड्डे आणि त्यात साचलेले पाणी यामुळे शहरातील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. त्यामुळे व्हिनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, राजारामपुरी, शाहूपुरी येथे वाहतूक कोंडी झाली. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम होता.

 

सकाळी १० वाजता ऊन पडले. मात्र, त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. संध्याकाळपर्यंत पाऊस सुरू होता. रात्री आठनंतर काही काळ पाऊस थांबला. पंचगंगा नदीची पाणी पातळी सकाळी ८ वाजता २६ फुटांवर होती. रात्री ८ वाजता पाणी पातळी ३१ फुटांवर होती. १२ तासांत पाणी पातळी ५ फुटांनी वाढली.

 

जिल्ह्यात २४ तासांतील पाऊस (आकडे मिमी मध्ये)

 

हातकणंगले- २२.५, शिरोळ – ७.९, पन्हाळा- ३८.८, शाहुवाडी- ३३.२, राधानगरी- ८०.२, गगनबावडा- ५१.५, करवीर- २१.८, कागल-२५.४, गडहिंग्लज- २४.१, भुदरगड- ५३.८, आजरा- ६६.९, चंदगड- ३३.९. जिल्ह्यात एकूण ३२.९ पाऊस पडल्याची नोंद आहे.

 

धरणातील पाणीसाठा (आकडे टीएमसीमध्ये)

 

राधानगरी – ८.२९

 

तुळशी – ३.४६

 

वारणा – ३२.३२

 

दूधगंगा – २३.३८

 

कासारी – २.७२

 

कडवी – २.५०

 

कुंभी – २.७१

 

पाटगाव – ३.७२

 

चिकोत्रा – १.५२

 

चित्री – १.८९

 

पाण्याखाली गेलेले बंधारे

 

शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे, यवलूज व कांटे, हळदी, राशिवडे, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे, दत्तवाड असे एकूण २३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -