दहावी आणि बारावीच्या निकालाच्या प्रक्रियेवर आणि परीक्षा पद्धतीवर तज्ज्ञांची अनेक मतमतांतरे आहेत. आता बारावी बोर्डाच्या निकालाच्या पद्धतीत बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
एनसीईआरटीच्या ‘परख’ युनिटने शिक्षण मंत्रालयाला अहवाल सादर केला आहे. यामध्ये सर्व शालेय बोर्डाच्या परीक्षांमध्ये मूल्यमापन प्रक्रिया एकसमान करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
सर्वा पालक आणि विद्यार्थ्यांना टेंशन असतं ते १० वी आणि १२वीच्या परीक्षेचं. मात्र आता ९ वीपासूनच पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा गांभीर्यानं घ्याव्या लागणार आहेत. कारण तुमच्या १२वीच्या बोर्डाच्या निकालावरच 9 वीच्या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण एनसीईआरटीच्या ‘परख’ युनिटने शिक्षण मंत्रालयाला तसा अहवाल सादर केला आहे. त्यासाठी प्रत्येक परीक्षेला विशिष्ट वेटेज देण्यात येणार आहे. नेमका काय आहे हा फॉर्म्युला ते पाहूयात.
कोणत्या परीक्षेला किती वेटेज?
9 वी15%
10वी 20%
11वी 25%
12वी 40%
‘परख’ अहवालानुसार, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजेच रचनात्मक मूल्यांकनावर असणार आहे. त्यामध्ये सत्र परीक्षा, परीक्षा रिपोर्ट कार्ड्स, गटचर्चा, प्रकल्प आदी सर्व घटकांचा विचार होणार आहे. ‘बोर्डांनी नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्या अनुषंगाने क्रेडिट ट्रान्सफरची प्रणाली विकसित करावी, अशी सुचना परखनं केलीय.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा अहवाल सर्व शाळा मंडळांना त्यांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेची पहिली फेरी झाली. या बैठकीत, राज्यांनी वर्गवार कामगिरीचा समावेश करण्यासाठी वेगळ्या दृष्टिकोनासाठी युक्तिवाद केल्याचे सांगितले जाते. या मंथनातून गुणवत्तापूर्ण निकाल पद्धती तयार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.