आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून अनेक घोषणा करण्यात आल्या. लाडकी बहीण या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यानंतर सरकारने लाडका भाऊ योजनेचीही घोषणा केली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलाना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण त्यापूर्वीच राज्यातील मुलींसाठीही एक योजना सरकारने जाहीर केली होती, त्याअंतर्गत घसघशीत रक्कमही मिळते. या योजनेनुसार एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1 लाख 1 हजार रुपये टप्प्याने देण्यात येतात. नेमकी ही योजना काय आहे, त्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते, त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘लेक लाडकी’ योजना
राज्य सरकारने महिलांसाठी याआधीपासूनच अनेक योजना सुरु केल्या आहेत. लाडकी बहिण योजनेपूर्वी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु केली होती. मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत टप्याटप्याने एकूण 1 लाख 1 हजार रुपये रक्कम प्रदान करण्याची ही योजना आहे. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य राज्यसरकारकडून देण्यात येते.
कोणत्या टप्प्यावर किती पैसे मिळणार?
मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रूपये या कुटुंबाला मिळणार आहेत. ही मुलगी पहिलीत गेली की सहा हजार रूपये मिळतील. सहावीत गेली की सात हजार रुपये मिळणार आहे. तसंच पुढच्या शिक्षणासाठीही सरकारकडून पैसे दिले जातील. ही मुलगी अकरावीत गेली ती आठ हजार रुपये दिले जातील. तर वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रूपये सरकारकडून दिले जातील.
काय आहेत अटी ?
1 एप्रिल 2023 या दिवसानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सरकारने विशेष योजना आखली आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना ही योजना लागू होते. ज्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. ते कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. तसंच या कुटुंबाचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल.
अर्ज कसा भराल ?
तुम्ही जिथे राहता तिथल्या अंगणवाडीत तुम्ही अर्ज करू शकता. या अर्जात वैयक्तिक माहिती भरावी लागेल. मोबाईल नंबर, रहिवासी पत्ता, मुलीची माहिती, बँक खात्याची माहिती देऊन हा अर्ज करता येऊ शकतो.
कोणती कागदपत्रं लागतील ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे.
– लाभार्थी मुलीच्या जन्माचा दाखला
– कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला
– कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र
– पालकांचे आधारकार्ड
– बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
– रेशनकार्ड ( पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड- साक्षांकित प्रत)
– मतदार ओळखपत्र
– लाभार्थीचा शाळेचा दाखला
– अंतिम लाभासाठी
मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे.