Thursday, June 26, 2025
Homeकोल्हापूरलग्नकार्यात 11 लाखांचे दागिने गायब, पोलिसांनी चक्रे फिरवत शोध लावला; कोल्हापुरातील गारगोटी...

लग्नकार्यात 11 लाखांचे दागिने गायब, पोलिसांनी चक्रे फिरवत शोध लावला; कोल्हापुरातील गारगोटी पोलिसांचे यश

लग्नकार्यात बॅगेतून गायब झालेले 11 लाखांचे दागिने शोधून काढण्यात कोल्हापुरातील गारगोटी पोलिसांना यश आलं आहे. लग्नकार्यात आलेल्या 30 ते 35 नातेवाईकांची सखोल चौकशी करून 126 ग्रॅम सोन्याच्या चोरीची उकल करण्यात आली आहे.

 

गारगोटीतील अनिकेत अजय सोनार यांचे 10 मे रोजी लग्न झाले. सदर लग्न कार्यक्रमाकरीता त्यांचे घरी अनेक नातेवाईक आले होते. त्यामध्ये त्यांची पुण्यातील आत्तेबहीण दिपाली आनंद घोडके या देखील आल्या होत्या. लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर दिपाली घोडके यांच्या कपड्यांच्या बॅगेतून सुमारे 126 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी भुदरगड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

लग्न कार्यक्रम असणारे घरातून अशा प्रकारे सोन्याचे दागीने चोरीस जाणे ही अत्यंत गंभीर घटना असलेने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.

 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथकाने अनिकेत अजय सोनार यांचे घरी जावून घटनास्थळाची माहिती घेवून त्यांचेकडे लग्न कार्याकरीता आलेले नातेवाईक व इतर लोक यांची माहिती घेतली. त्यानंतर सुमारे 30 ते 35 लोकांकडे सखोल तपास केला.

 

लग्न कार्याकरता आलेल्या नातेवाईकांमध्ये बाहेरगावाहून काही नातेवाईक आले होते. लग्न झाल्यानंतर ते परत मूळगावी गेल्याची माहिती पोलिसांनी मिळवली. सदर माहितीचे अनुषंगाने बाहेरील गावच्या नातेवाईकाकडून माहिती घेतली. त्यामध्ये बारामती येथे गेलेले महिला नातेवाईक ही लग्न कार्यक्रमाकरीता आली त्यावेळी ती फिर्यादी दिपाली यांचे सोबत एकत्र राहण्यास होत्या. त्यामुळे बारामती येथील महिला नातेवाईकास फोन करून चौकशीकरीता हजर राहणेबाबत सांगीतले असता.

 

पोलिसांनी तिची कपड्यांची बॅग तपासली असता सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स बारामती येथील महिला नातेवाईकाच्या बॅगेत मिळून आला. हा दागिण्याचा बॉक्स नजरचुकीने त्यांच्या बॅगमध्ये राहिल्याचा आढळून आलं. सदरचे 11,30,400 रुपये किमतीचे 126 ग्रॅमचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीकरीता भुदरगड पोलीस ठाणे येथे जमा केले आहेत.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अमंलदार सतिश जंगम, प्रकाश पाटील, राजू कांबळे, समीर कांबळे, दिपक घोरपडे, संजय पडवळ व महिला पोलीस अमंलदार भाग्यश्री कुलकर्णी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -