“माझं तर घरच तुटलं आहे. मुलांना घेऊन आता कुठे जाऊ? आता आमचं कोणीही उरलेलं नाही. माझ्या घरातील लक्ष्मी गेली. आसरा गेला,” नीलांचल साहू आक्रंदत बोलत होते. आपल्या कुटुंबातील तीन व्यक्ती गमावलेल्या नीलांचल यांना आपलं दु:खं आवरता आवरत नव्हतं.
कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या चार मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होतं. तेव्हाच चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण 6 व्यक्ती जखमी झाल्या असून 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत 41 वर्षीय नीलांचल साहू यांच्या कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये त्यांच्या पत्नी 38 वर्षीय सुनीता साहू, 56 वर्षीय सासू प्रमिला साहू आणि 32 वर्षीय मेहुणी सुजाता पाडी यांचा समावेश आहे. सासू आणि मेहुणी त्यांच्याकडे दोन दिवस पाहुण्या म्हणून रहायला आल्या होत्या.
या घटनेत साहू यांची 14 वर्षांची मुलगी सुदैवाने वाचली. त्यांचा 17 वर्षांचा मुलगा ट्यूशनला गेला होता. त्यामुळे, तोही वाचला. पण, या घटनेचा त्यांच्या मुलांवर खोल परिणाम झाला आहे. ते दोघे अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत, असं साहू कुटुंबीयांनी बीबीसीशी बोलनाता सांगितलं.
“पत्नी , सासू आणि मेहुणी गेली. आता कोणाच्या आधाराने आम्ही जगायचं? माझ्या मुलांचं काय होईल? आता असं वाटतंय की, मी जगलो नाही तरी चालेल.”
हंबरडा फोडून झाल्यावर कसंबसं सावरत नीलांचल बीबीसीला या घटनेची माहिती देत होते.
20 मे 2025 च्या दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा महाराष्ट्र नगर इथे ही हृदयद्रावक दुर्घटना घडली. सुमारे 40 वर्ष जुन्या सप्तशृंगी इमारतीचा भाग एका क्षणात कोसळला.
स्लॅब कोसळून इमारतीचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाला आणि त्याखाली सहा जण अडकले. इतर सहा जणांना या मलब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले.
‘हे निष्काळजीपणाचं प्रतीक’
कल्याण इमारत स्लॅब दुर्घटना फक्त अपघात नव्हती. हे निष्काळजीपणाचं, व्यवस्थेच्या अपयशाचं आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत झालेल्या अनास्थेचं प्रतीक आहे, असं आजूबाजूला राहणारे लोक सांगतात.
BBCसाहू यांचा मुलगा
या घटनेत इमारतीत राहणाऱ्या साहू, यादव, चव्हाण, खरात, गुजर आणि शेलार या कुटुंबाच्या आयुष्यातलं हसू लोपलंय . कारण आजवर समोरासमोर सहवासात असणाऱ्या सहा सदस्यांचा यात मृत्यू झाला.
याच घटनेत इमारतीतील तळमजल्यात राहणारे निखिल खरात गंभीर जखमी आहेत, मात्र, ते सुदैवाने बचावले आहेत.
‘चौथ्या मजल्यावरील फरशीचा बेस सामानासहित कोसळला’
प्रत्यक्षदर्शी आणि जखमी खरात यांचे मावसबंधू राहुल कारंडे या घटनेबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, “ही घटना घडली तेव्हा आम्ही बाजूलाच एका घरात होतो. चौथ्या मजल्यावरील काम सुरू असताना फरशीचा बेस थेट सामानासहित खाली तळमजल्यापर्यंत कोसळला. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या घरातील लोक या ढिगाऱ्याखाली अडकले. हे अवघ्या काही क्षणात घडले होते.”
BBCजखमी खरात यांचे मावसबंधू राहुल कारंडे
कारंडे यांनी पुढं सांगितलं की, “या दुर्घटनेत तळमजल्यावर असणारा माझा भाऊ देखील अडकला होता, मात्र सुदैवाने आम्ही तिथे पोहोचून त्याला तातडीनं बाहेर काढलं. तसंच इतर लोकांना देखील आम्ही बाहेर काढलं. इमारत जुनी आणि धोकादायक झालेली आहे. इमारतीचा अजूनही काही भाग थोडा थोडा पडतो आहे ”
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
सप्तशृंगी इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. या इमारतीच्या काही भागात डागडुजीचे काम सुरू होते. तसेच, जो भाग कोसळला त्याच भागातील चौथ्या माळ्यावर फरशी बसवण्याचं काम सुरू होत. याचदरम्यान ही दुर्घटना घडली.
राज्यात अनेक शहरात धोकादायक, जर्जर आणि स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या अनेक इमारती आहेत. काही धोकादायक इमारतींमधील रहिवासी नोटिसा बजावूनही घरे रिकामी करण्यास तयार होत नाहीत. तर काही इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने या इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान स्थानिक प्राधिकरणापुढे आहे.
BBCसप्तशृंगी इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते.
काही जमीनमालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि स्थानिक प्राधिकरणाच्या संथ कारभारामुळे स्थानिक रहिवासी आधी आमचे पुनर्वसन करा मगच आम्ही घरे रिकामी करतो, अशी भूमिका घेत आहेत.
त्यामुळे कल्याण-डोंबिवली भागात अनेक ठिकाणी लोक जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. मात्र, आता या दुर्घटनेमुळे धोकादायक, जर्जर आणि स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि तिथे राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षतेचा मुद्दा देखील.
स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पालिकेने इमारतीला दिली होती सूचना
या घटनेसंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनय गोयल बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, “या इमारतीमध्ये एका घरात विनापरवानगी काम सुरू होते. त्यामुळे ही घटना घडली असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोकादायक आणि अति धोकादायक इमारतीच्या यादी मधली ही इमारत नव्हती. मात्र, स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पालिकेने इमारतीला सूचना दिली होती.”