आयपीएल 2025 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स संघ खेळला. पण या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार राहिली. गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे आयपीएलमधून धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगू लागली होती. पण धोनीने यावर मौन बाळगणं पसंत केलं होतं. आता 2026 आयपीएल स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशा स्थितीत महेंद्रसिंह धोनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. त्याचा निर्णय ऐकून क्रीडाप्रेमी आश्चर्यचकीत झाले आहे. कारण महेंद्रसिंह धोनीने आणखी पाच वर्षे खेळण्याची इच्छा वर्तवली आहे. पण त्याने आपल्या फिटनेसबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे त्याचा आयपीएल खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
धोनीने नेमकं काय सांगितलं?
महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर फक्त आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. आयपीएलमध्ये 14 पैकी 13 सामन्यात फलंदाजी केली. त्याने 24.50 च्या सरासरीने फक्त 196 धावा केल्या. चेन्नईत एका कार्यक्रमात महेंद्रसिंह धोनीला आयपीएल 2026 स्पर्धेबाबत प्रश्न विचारले गेले. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘मला पुढचे पाच वर्षे क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे. पण डॉक्टरांना फक्त डोळ्यांच्या नजरेसाठी ही परवानगी दिली आहे. माझ्या शरीरासाठी नाही दिली. अशा स्थितीत मी फक्त माझ्या डोळ्यांनी क्रिकेट खेळू शकत नाही.’
महेंद्रसिंह धोनीवर चेन्नई सुपर किंग्स संघ व्यवस्थापनाने अजूनही विश्वास टाकला आहे. धोनी संघासोबत असावा यासाठी त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. धोनीने संघ व्यवस्थापनाबाबत सांगितलं की, ‘आमचं नातं खूप जुनं आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वीपासून आहे. मी 2005 मध्ये कसोटीत डेब्यू सामना चेन्नईत खेळलो होतो. तेव्हापासून चेन्नईसोबत माझं खास नात आहे. त्यानंतर सीएसकेसोबत आल्यानंतर नातं आणखी घट्ट झालं. कारण आयपीएलदरम्यान मी 40 ते 50 दिवस येथे घालवतो.’
महेंद्रसिंह धोनीने सांगितलं की, आयपीएल 2025 मध्ये ऋतुराज गायकवाड जखमी झाल्याने फलंदाजी क्रमात गडबड झाली. पुढच्या पर्वात आम्ही सुधारणा करू. पुढच्या पर्वात पुन्हा एकदा ऋतुराज कर्णधारपद भूषवू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. मिनी लिलावात काही चांगले खेळाडू संघात येऊ शकतात. त्यामुळे आमची फलंदाजी आणखी मजबूत होईल.