कोल्हापूरात मटणाचे शौकिन खूप आहेत. मटण विक्रतेही आपल्याकडे ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बुलाव डाव करत असतात याच प्रकारातून मात्र पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे मटण विक्रेत्यांच्यात चांगलीच जुंपली.
यावरुन तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
गावाच्या मध्यभागी मटण मार्केट आहे. या मटण मार्केटमध्ये एखादे गिऱ्हाईक आले की आपल्याच दुकानात मटण खरेदी करावे यासाठी मोठी स्पर्धा मटण विक्री करणारे दुकानदारांच्यात नेहमी सुरू असते. याच कारणावरून रविवारी गिऱ्हाईकाला बोलविण्यावरून मुनाफ चिकन सेंटर व विजय मटण शॉप या दुकानांच्या मालकांमध्ये तुफान हाणामारी झाली. या मारामारीत मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे हे जखमी झाले आहेत.
या मारामारीच्या घटनेनंतर मुनाफ कवठेकर व विजय घोटणे यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. मुनाफ नजरुद्दीन कवठेकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार विजय रंगराव घोटणे, तानाजी रंगराव घोटणे, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे, धैर्यशील विजय घोटणे, गौरव तानाजी घोटणे सर्व. रा.पुलाची शिरोली यांच्याविरोधात रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच विजय रंगराव घोटणे याने दिलेल्या फिर्यादीवरून मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, मुस्तफा नजरुद्दीन कवठेकर, वहाज कवठेकर, नजरुद्दीन कवठेकर, सुबहान देसाई सर्व, रा.पुलाची शिरोली यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या सर्वांना सोमवारी पेठवडगाव येथील न्यायालयात हजर केले असता विजय रंगराव घोटणे, तानाजी रंगराव घोटणे यांना एक दिवसाची तर मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, मुस्तफा नजरुद्दीन कवठेकर, नजरुद्दीन कवठेकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची गावभर चर्चा सुरू होती.