भारतात दिवाळीची धूम सुरू आहे. शेअर बाजारात कमाईचा एक तास दरवर्षी मिळतो. मुहूर्त ट्रेंडिग सत्राकडे सर्वांचे लक्ष असते. पण यंदा त्यामध्ये मोठा बदल झाला आहे. अनेक दशकानंतर ट्रेडिंगची संध्याकाळची वेळ बदलली आहे. यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दुपारी करण्यात आली आहे. मुहूर्त ट्रेडिंग हा दिवाळीच्या दिवशी आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन आर्थिक वर्ष संवत 2082 च्या सुरुवातीचे प्रतिक मानल्या जाते. शेअर बाजाराला दिवाळीत सुट्टी असते. पण दिवाळीला एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येते. यंदा ही वेळ काय असेल ते जाणून घेऊयात.
यंदा मुहूर्त ट्रेंडिग 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी होईल. प्री-ओपन सत्र दुपारी 1:30 वाजेपासून ते 1:45 वाजेपर्यंत असेल. मग मुख्य व्यापारी सत्र दुपारी 1:45 वाजेपासून ते 2:45 वाजेपर्यंत होईल. तर सत्राची अखेर दुपारी 3:05 वाजेपर्यंत चालेल. यापूर्वी हे सत्र संध्याकाळी 6 अथवा 7 वाजता सुरू होत असे. हे सत्र दुपारी होत असल्याने व्यापाऱ्यांना आता संध्याकाळी त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करता येईल. बाजारावरील कामकाजाचे ओझे राहणार नाही. तर लाखो गुंतवणूकदारांना पण मुहूर्त ट्रेंडिंगसाठी संध्याकाळी ताटकळत राहावे लागणार नाही.
यापूर्वी काय होती संभावित वेळ
यंदा मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग होणार होते. मंगळवारी संध्याकाळी 6.15 वाजता शेअर बाजारात व्यापारी सत्र सुरु करण्यात येणार होते. तर हा ट्रेडिंग मुहूर्त 7.15 वाजता बंद होणार होता. म्हणजे एक तासाठी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग होणार होते. आता ही वेळ दुपारी करण्यात आली आहे.
मुहूर्त ट्रेडिंग का खास?
मुहूर्त ट्रेडिग हे समृद्धीचे प्रतिक मानण्यात येते. या सत्रात ट्रेडिंग केल्याने संपूर्ण वर्षात सकारात्मक वातावरण असल्याचे मानल्या जाते. अनेक व्यापारी वार्षिक ट्रेडिंग हा त्यांच्या वर्षभरातील व्यापारी सत्राचे धोरण ठरवण्याचा मुहूर्त मानतात. ही परंपरा आजही अनेक व्यापारी आणि फर्म जपतात.
गेल्यावर्षी गुंतवणूकदार मालामाल
भारतीय शेअर बाजार गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी मुहूर्त ट्रेडिंगवेळी चांगला उसळला होता. सेन्सेक्स 335.06 अंक वा 0.42 टक्क्यांनी वाढून 79,724.12 वर आणि निफ्टी 99 अंक वा 0.41 टक्क्यांनी वधारून 24,304.30 वर बंद झाला होता. जवळपास 2904 शेअरमध्ये तेजी आली. 540 शेअर घसरले आणि 72 शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही. अनेक गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला होता. यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे लागले आहे.