हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या वादातून टोळक्याने एका तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना मखमलाबादरोडवरील महादेव कॉलनीत घडली. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून, टोळक्यातील एकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अचानक काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रभान गणपत चोथवे (वय २३ रा. तरसेचाळ, क्रांतिनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, सुमित बोडके व त्याचे अन्य दोन साथीदार पसार झाले आहेत. याबाबत अमोल धनराज कुमावत ( रा. कुमावतनगर, मखमलाबादरोड ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या घटनेत स्पर्श नितीन कामे ( वय २१, रा. पूनम किराणाजवळ, कुमावतनगर ) हा युवक जखमी झाला आहे.
स्पर्श कामे हा युवक शुक्रवारी (दि. १२) रात्री मित्र मयूर कुमावत याच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त महादेव कॉलनीत गेला होता. हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना स्पर्श कामे याचा चंद्रभान चोथवे यास धक्का लागला. यावेळी झालेल्या वादात टोळक्याने स्पर्श कामे यास मारहाण केली. तर, सुमित बोडके याने ”थांब तुझा मर्डर करून टाकतो,” असे म्हणत स्पर्शवर चाकू हल्ला केला .
पोटाजवळ धारदार चाकूने वार
या घटनेत कामे याच्या पोटाजवळ धारदार चाकू खुपसण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. फिर्यादी कुमावत याच्यासह नातेवाइकांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने त्यांनाही शिवीगाळ करीत तुम्हालाही बघून घेऊ, अशी धमकी देत काढता पाय घेतला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.





