नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीच्या आरोग्याबाबत समाधानकारक अहवालाच्या आधारे एक तपासणी करण्याचे ठरले होते.
महत्त्वाचे म्हणजे उच्चस्तरीय समितीची न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडून नांदणी संस्थान मठ, वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जो संयुक्त प्रस्ताव सादर केला गेला होता, त्या हत्ती पुनर्वसन केंद्राच्या उभारणीबाबत बांधकाम पूर्वपरवानगी देण्यात आली. त्यामुळे नांदणी येथे उभारण्यात येणार्या हत्ती पुनर्वसन केंद्राच्या कामाला गती येणार असून महादेवी हत्तीण परत येण्याचा मार्गही मोकळा होत आहे.
नांदणी येथे महादेवी हत्तिणीसाठी उभारण्यात येणार्या पुनर्वसन केंद्राच्या सर्व आवश्यक परवानग्यांचा अहवाल तयार करून रेकॉर्डवर आणण्यासाठी एचपीसीने मुदत दिली होती. त्यामुळे सोमवारी सायंकाळी नांदणी येथील महादेवी हत्तिणीप्रकरणी उच्चस्तरीय समितीसमोर अत्यंत सकारात्मक सुनावणी ऑनलाईन पार पडली.
हत्तीण परत येण्याचा निर्णय लवकरच
सोमवारच्या झालेल्या सकारात्मक निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रसह कर्नाटक सीमाभागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नांदणी मठ, वनतारा यांच्याकडून उभारण्यात येणार्या हत्ती पुनर्वसन केंद्रासाठी लागणार्या सर्व परवानग्या या काढाव्या लागणार आहेत. शिवाय, या केंद्राचे बांधकाम आणि सोयीसुविधा कशा देणार याचीही माहिती तयार केल्यानंतर ते उच्चस्तरीय समितीला द्यावी लागणार आहे. त्यानंतर महादेवी हत्तीण परतण्याचा पुढील निर्णय अपेक्षित आहे.








