अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आता एक महिना झाला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात हे युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू आहे. परंतु त्यातून अद्याप कोणताही ठोस पर्याय समोर आलेला नाही. असे असतानाच आता अमेरिकेने इराणविरोधात सर्वात मोठे पाउल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता अमेरिकेची यूएसएस त्रिपोली नावाची युद्धनौका पश्चिमी आखातात पोहोचली आहे. या युद्धनौकेवर तब्बल 3500 सैनिक आहेत. सोबतच या लढाऊ जहाजावर काही लढाऊ विमानंही आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या मनात नेमकं काय आहे, असं विचारलं जातंय.
पश्चिम आशियात पोहोचलेले हे 3500 सैनिक त्या भागात अगोदरच तैनात असलेल्या 50 हजार सैनिकांना जाऊन मिळाले आहेतच. एकीकडे अमेरिका-इराणची चर्चा चालू असताना शनिवारीच (28 मार्च) हे सैनिक पश्चिम आशियात पोहोचले आहेत.
परंतु वॉल स्ट्रिट जर्नलच्या वृत्तानुसार इराणच्या ताब्यात असलेले खार्ग बेट ताब्यात घेण्यासाठीच अमेरिकेकडून ही मोहीम राबवली जाऊ शकते. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्यातरी हे युद्ध भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


