Thursday, April 30, 2026
Homeकोल्हापूरलव्ह जिहाद प्रकरणाची व्याप्ती वाढली; साथीदाराला अटक

लव्ह जिहाद प्रकरणाची व्याप्ती वाढली; साथीदाराला अटक

सतरा ते पंचवीस वयोगटातील निष्पाप तरुणींवरील लैंगिक अत्याचाराची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत. नराधमांच्या वासनांध शिकारीला बळी पडलेल्या आणखी एका पीडित तरुणीने मंगळवारी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे धाव घेत कैफियत मांडली आहे.

 

तपास योग्य दिशेने सुरू आहे. आवश्यकता भासल्यास ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

 

लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शाहिद समीर सनदे (22, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) याचा फरार साथीदार शाहरुख हुसेन देसाई (30, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) याच्या कराड परिसरात मंगळवारी दुपारी मुसक्या आवळण्यात आल्या. सायंकाळी त्याला बंदोबस्तात कोल्हापूर येथे आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. मुख्य संशयित शाहिद सनदे व साथीदार शाहरुख देसाई यांच्या वापरातील मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. मोबाईलमधील डेटा, कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात येत आहे. गुन्ह्यात वापर झालेल्या मोबाईलची फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणी करण्यात येत आहे. संबंधित मोबाईल तज्ज्ञांच्या पथकाकडे सोपविण्यात आल्याचेही पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

 

शिरोलीत ‘लव्ह जिहाद’प्रकरणी कडकडीत बंद

 

शिरोली पुलाची : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून अत्याचार प्रकरणातील संशयित शाहिद सनदे आणि शाहरूख देसाई यांच्या निषेधार्थ मंगळवारी शिरोली गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात संशयितांनी 18 ते 22 वयोगटांतील तरुणींशी सोशल मीडियावर मैत्री करून त्यांना जाळ्यात ओढले. पीडित तरुणींचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले तालुक्यातील अनेक मुली या जाळ्यात अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर हातकणंगले पोलिसांनी मुख्य संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेचे वृत्त समजताच गावात संतापाची लाट उसळली. गावातील माळवाडी महादेव मंदिरातील बैठकीनंतर सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. यावेळी आ. अमल महाडिक म्हणाले, हे कृत्य निंदनीय असून, आरोपींचे पाणी व वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. चार दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास मूक मोर्चाचा इशाराही त्यांनी दिला. आ. अशोकराव माने म्हणाले, शिरोली हे गाव सुसंस्कृत असून, असला प्रकार खपवून घेणार नाही.

 

‘ऑपरेशन लंगडा’ सुरू करू : पवार

 

शिवसेना ‘उबाठा’ पक्षाचे संजय पवार म्हणाले, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापून वरिष्ठ महिला अधिकार्‍याची नियुक्ती करावी. ‘ऑपरेशन लंगडा’ सुरू करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. सरपंच पद्मजा करपे, संजय चौगुले, महेश चव्हाण, सुरेशराव यादव आणि सलीम महात यांनीही दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. दरम्यान, सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार होता; मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. खबरदारीचा उपाय म्हणून संभाजी चौक, संशयितांच्या घरांचा परिसर आणि मुख्य प्रवेशद्वारावर मोठा पोलिस फौजफाटा तैनात होता.

 

यावेळी पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी संतप्त आंदोलकांशी संवाद साधत चार दिवसांच्या आत सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, ग्रामस्थांनी संशयितांना कठोर शिक्षा होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, शिव प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यवाह सुरेशराव यादव, गाव अध्यक्ष नितीन चव्हाण, शहरप्रमुख राजकुमार पाटील, अशोक खोत, माजी उपसरपंच कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव, बाळासाहेब पाटील, श्रीकांत कांबळे, भाजपचे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दीपक रानमाळे, भाजप पंचायतराज अध्यक्ष सतीश पाटील, राहुल अष्टेकर, योगेश खाडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष संभाजी भोसले, बजरंग दलाचे योगेश खाडे, नीलेश शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे प्रमोद पाटील, अभिजित कोळी, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, संपत संकपाळ, शशिकांत खवरे, राहुल खवरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शाहिद समीर सनदे याची महाविद्यालयातून हकालपट्टी

 

हातकणंगले : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील संशयित आरोपी शाहिद समीर सनदे (रा. शिरोली, ता. हातकणंगले) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार दिवस पोलिस कोठडीही मिळवली. सनदे कोल्हापूर-सांगली महामार्गावर असलेल्या एका महाविद्यालयात शिकत होता. दरम्यान, अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत आरोपीची हकालपट्टी करण्याची मागणी केली. महाविद्यालय प्रशासनाकडून आरोपी सनदे याला महाविद्यालयातून काढून टाकल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -