Monday, May 4, 2026
HomeइचलकरंजीAI आणि आधुनिक शेतीकडे वळा: आमदार अशोकराव माने यांचा शेतकऱ्यांना सल्ला

AI आणि आधुनिक शेतीकडे वळा: आमदार अशोकराव माने यांचा शेतकऱ्यांना सल्ला

हातकणंगले/ शिवाजी पाटील

मुक्त अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या जागतिक स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी व नैसर्गिक आपत्ती, वातावरणात सातत्याने होत असलेले बदल या आव्हानांचा मुकाबला करून शेती फायदेशीर करण्यासाठी AI सारख्या अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन हातकणंगले विधानसभेचे आमदार अशोकराव माने(बापू) यांनी केले. हातकणंगले तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामपूर्व नियोजन व आढावा सभा शनिवार दिनांक २ मे रोजी हातकणंगले तहसील कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोकराव माने ( बापू) बोलत होते. आमदार राहुल आवाडे आणि खासदार धैर्यशील माने हे प्रमुख निमंत्रित म्हणून उपस्थित होते.

राजस्तरीय आणि जिल्हास्तरीय पिक स्पर्धेत विजेया ठरलेल्या हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हातकणंगले तालुक्याचे कृषी अधिकारी श्री. स्वप्नील माने यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेऊन झालेल्या कामाची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी कार्यालयातील रिक्त असलेल्या जागेमुळे कामाचा ताण वाढला आहे यासाठी ही पदे तत्काळ भरावीत अशी मागणी केली.

इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांसाठी असलेली पिक विमा योजना, बी- बियाणे आणि खताची उपलब्धता केंद्र आणि राज्यसनाने केलेली कर्जमाफी याबद्दल माहिती दिली शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने मोठा निधी आणि अनुदान उपलब्ध केले जात आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेदभाव न करता गरजू शेतकऱ्यांच्या पर्यंत वेळेत या योजनांचा लाभ द्यावा याची काळजी घ्यावी, कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याचा इशारा दिला.

उपस्थित शेतकऱ्यांकडून अडीअडचणी समजावून घेतल्या. पुढील काळात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अध्यक्ष पदावरून बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी शेतकऱ्यांच्या साठी तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी भवन व अन्नधान्य साठवण्यासाठी गोडाऊन उभा करण्याचा संकल्प बोलून दाखवला. तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान समजावून घेऊन कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करून फायदा मिळवावा. पारंपरिक मानसिकता बदलून प्रयोगशील शेती करण्यासाठी आव्हान केले.

कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आधुनिक तंत्रज्ञान समजावून घेऊन सोप्या भाषेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हातकणंगले तालुका कृषी विभागाने आढावा बैठक घेऊन शेती संदर्भात विविध विषयांवर चर्चा घडवून आणल्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच लाभ होणार आहे. सहा महिन्यातून एकदा तरी अशी बैठक होण्याची गरज व्यक्त केली. तसेच तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या केलेल्या कामाचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -