पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या ठिकाणी भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही पराभव झाला आहे. या पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी बंगाल पोलिसांनी बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला आहे. पोलिसांनी बॅनर्जी यांच्या घराबाहेर बसवलेले अॅडव्हान्स ऑटोमेटेड गेट हटवले असून हा रस्ता आता सर्वसामान्य लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही कमी करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ममता बॅनर्जी यांनी मोठा धक्का
मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येखील निवासस्थानाबाहेर स्टीलचे अॅडव्हान्स गेट बसवले होते, मात्र मतमोजणीनंतर ते काढून टाकण्यात आले आहे. तसेच हा रस्ता आता सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. हे गेट हटवतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षे सत्तेत असलेल्या टीएमसीच्या सत्तेचा अंत झाल्यानंतर बंगाल पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
भाजपचा 207 जागांवर विजय
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 294 आमदार असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपाला 207 जागा मिळाल्या आहेत, तर टीएमसीला फक्त 80 जागांवर समाधान मानावे लागले आहे. ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून सुमारे 15 हजार मतांनी पराभूत झाल्या आहेत. त्यांना भाजपचे शुभेंदु अधिकारी यांनी हरवले आहे. 4 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या घराबाहेर आणि नबन्ना येथील कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
टीएमसीच्या 22 मंत्र्यांचा पराभव
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सरकारमधील 35 मंत्र्यांपैकी 22 जणांचा पराभव झाला आहे. कॅबिनेट मंत्र्यांपैकी सुमारे 63 टक्के मंत्री आपली जागा वाचवू शकले नाहीत. महिला व बालविकास, उद्योग, गृहनिर्माण, वीज, शिक्षण, परिवहन आणि मागासवर्गीय अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्र्यांनाही मतदारांनी नाकारले. त्यामुळे आता बंगालमध्ये भाजप पहिल्यांदाच सत्ता स्थापन करताना पहायला मिळत आहे. बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




