खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढ संदर्भात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ट्रेडींगधारकांनी मजुरीवाढ करण्यासंदर्भात ठोस भूमिका न घेतल्याने पुन्हा बुधवारी दुपारी ४ वाजता बैठक बोलविण्यात आली आहे. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत यंत्रमागधारक प्रतिनिधी व ट्रेडींगधारक यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली. तर बुधवारपर्यंत खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी यंत्रमाग बंदच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.
यंत्रमागधारकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाही साकडे घातले. त्यानुसार सोमवारी द्वारी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रेडिंग असोसिएशन व खर्चीवाला यंत्रमागधारक प्रतिनिर्धीची बैठक झाली.
बैठकीच्या सुरुवातीला यंत्रमागधारकांच्या वतीने पुंडलिक जाधव, विनय महाजन, धर्मराज जाधव, नंदकुमार लोखंडे, शहाजी माहिती दिली. त्यावर ट्रेडींगधारकांच्या वतीने विनोद कांकाणी, रामपाल भंडारी, ओमप्रकाश दरक व कमलकिशोर राठी यांनी आपली बाजू मांडली. २०१३ पासून प्रचलित मजुरीत वाढ होत ५२ पिक बेसवर सध्या साडेसहा पैसे मजुरी मिळत आहे. त्यामध्ये किमान ५ पैशांची वाढ केली पाहिजे, अशी मागणी विनय महाजन यांनी केली.
तर अन्य ट्रेडींगधारक प्रतिनिधींनी मजुरीवाढ संदर्भात आम्हीही सकारात्मक आहोत. या प्रश्नी अन्य पदाधिकारी व व्यापाऱ्यांची चर्चा करुन निर्णय घेऊ असे सांगितले. त्यावर प्रांताधिकारी शिंदे यांनी, हा प्रश्न आजच संपण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
दरम्यान, प्रांताधिकारी आवारात उपस्थित खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या कुटुंबियांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. ट्रेडींगधारक आपल्याच भूमिकेवर ठाम असल्याचे दिसताच प्रांताधिकाऱ्यांनी अन्य प्रतिनिधींना बोलावून घेऊन आजच निर्णय करावा, असे सांगितल्यानंतर घनश्याम इनानी हे बैठकीत आले. त्यांनीही सन २०१३ पासून मजुरीवाढ दिलीच नाही असा आरोप करणाऱ्यांनी आमची माफी मागावी असे वक्तव्य केल्याने संतप्त विनय महाजन यांनी त्यांना खडे बोल सुनावले. यावेळी दोन्ही बाजूकडील प्रतिनिधी उठून बोलू लागल्याने गोंधळ निर्माण झाला. अखेर प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूची स्वतंत्र बाजू ऐकून घेत या संदर्भात बुधवारी दुपारी ४ वाजता पुन्हा बैठक आयोजित करण्यात येत असल्याचे घोषित केले.
बुधवारच्या बैठकीत दोन्हीही बाजूंनी समन्वयाची भूमिका घेत खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढ प्रश्नी प्रांत कार्यालयात संयुक्त बैठक बोलावली होती. यावेळी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. बैठकीवेळी सदर कुटुंबियांनी घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
अन्यथा तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने प्रशासन आपल्या परिने निर्णय जाहीर करेल. तो दोघांनाही मान्य करावा लागेल. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी शिंदे यांनी केले. बैठकीस अप्पर तहसिलदार महेश खिलारी, सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे, शिवाजीनगरचे पोलिस निरिक्षक शिवाजी गायकवाड आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




