Homeइचलकरंजीतारदाळ: शाळेची बस सुटली, पण चिमुकल्याच्या आयुष्यातला आईचा हात कायमचा सुटला!

तारदाळ: शाळेची बस सुटली, पण चिमुकल्याच्या आयुष्यातला आईचा हात कायमचा सुटला!

तारदाळच्या ठाकरे नगर परिसरात आज सकाळी दुःखाचा एक मोठा डोंगर कोसळला. अवघ्या ३५ वर्षांच्या पद्मिनी प्रफुल कांबळे आपल्या चिमुकल्याला हसत-खेळत शाळेच्या बसमध्ये बसवून घराकडे परतत होत्या. मातृत्वाची ती नित्य आणि आनंदी कर्तव्यपूर्ती होती. पण काळाला बहुदा या साध्या, निष्पाप आनंदाचाही हेवा वाटला असावा.

 

हातकणंगलेकडून आलेल्या एका ‘मॅक्सिमा’ वाहनाने त्यांना अशी काही जोरदार धडक दिली, की उपचाराचा तातडीचा प्रयत्नही निष्फळ ठरला आणि इचलकरंजीच्या रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

 

शहापूर पोलिसांनी वाहनचालक अनिल पुजारी याला ताब्यात घेतले आहे, पंचनामा झाला आहे आणि तक्रारही नोंदवली गेली आहे. कायद्याची ही नेहमीची चक्रे आता आपल्या गतीने फिरत राहतील. पण ज्या आईच्या हाताचा ऊबदार स्पर्श त्या लहानग्याला आता कधीच मिळणार नाही, त्या पोकळीचे काय?

 

खरी शोकांतिका ही आहे की, ज्या परिसरात ही दुर्घटना घडली तेथे अंगणवाडी आहे, शाळा आहे आणि बालपणाचा गजबजाट आहे. तरीही तेथून सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या बेफिकिरीला वेसण घालणारे कुणी नाही. अपघात घडला की रस्त्यावर स्पीड ब्रेकर आणि दिशादर्शक फलक हवेत अशी चर्चा नेहमीप्रमाणे सुरू होते; पण प्रशासनाला आपले डोळे उघडण्यासाठी नेहमी एखाद्या निष्पाप जिवाची आहुतीच का द्यावी लागते?

 

आज तारदाळ गावात शोककळा पसरली आहे, नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. पण फक्त हळहळ व्यक्त करून आणि अश्रू ढाळून हा प्रश्न सुटणारा नाही. रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर नक्कीच बसवतील, पण प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळपणावर आणि बेदरकार चालकांच्या मानसिकतेवर कधी ‘स्पीड ब्रेकर’ लागणार, हाच खरा सवाल आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -