Homeमहाराष्ट्रमहिनाअखेर सलग 5 दिवस बँका बंद! कोण-कोणत्या सेवा सुरू राहणार?

महिनाअखेर सलग 5 दिवस बँका बंद! कोण-कोणत्या सेवा सुरू राहणार?

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण करायची असतील, तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) 28 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत 3 दिवसांच्या देशव्यापी संपाचा प्रस्ताव मांडला आहे.

 

ही संघटना बँकिंग क्षेत्रातील सुमारे 90 टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

संपाच्या कालावधीत बँक शाखांमधील प्रत्यक्ष कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने देशातील सर्वात मोठी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) आपल्या ग्राहकांना सर्व महत्त्वाची कामे वेळेत उरकून घेण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे.

 

 

5 दिवस बँकांचे कामकाज प्रभावित होणार

 

28 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित असलेल्या तीन दिवसांच्या देशव्यापी संपापूर्वी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी अनुक्रमे चौथा शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी येत आहे. यामुळे 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान सलग 5 दिवस ग्राहकांना बँक शाखेत जाऊन प्रत्यक्ष काम करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे ज्या ग्राहकांना शाखेत जाऊन कामे पूर्ण करायची आहेत, त्यांनी ती सर्व कामे 25 सप्टेंबरपूर्वीच उरकून घ्यावीत.

 

SBI ची मेसेजद्वारे ग्राहकांना दिल्या सूचना

 

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व ग्राहकांना यासंदर्भात एसएमएस (SMS) पाठवून सतर्क केले आहे. ‘प्रिय बँक ग्राहक, काही कर्मचारी संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 दिवसांच्या संपाचे आवाहन केले आहे. कृपया तुमची बँकेची महत्त्वाची कामे यापूर्वीच पूर्ण करून घ्या. बँकिंग सेवांसाठी एटीएम (ATM) / एडीडब्ल्यूएम (ADWM), ग्राहक सेवा केंद्र, योनो (YONO), युपीआय (UPI) किंवा अन्य डिजिटल सेवांचा वापर करा,’ असे या मेसेजमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

 

याशिवाय, शाखेतील प्रत्यक्ष कामकाजावर होणारा परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या संपातील सहभागावर अवलंबून असेल. मात्र सेवा सुरळीत ठेवण्यासाठी बँकेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही बँकेने नमूद केले आहे.

 

25 सप्टेंबरपूर्वीच ही कामं उरकून घ्या

 

बँक कर्मचाऱ्यांची मदत किंवा प्रत्यक्ष कागदपत्रांची गरज असणाऱ्या कामांवर या संपाचा मोठा परिणाम होऊ शकतो. रोख रक्कम जमा करणे, चेकशी संबंधित कामे, केवायसी (KYC) अपडेट करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, डिमांड ड्राफ्ट (DD) बनवणे किंवा कर्मचाऱ्यांच्या मदतीने करावयाची इतर कामे संपादरम्यान रखडू शकतात किंवा त्यांना विलंब होऊ शकतो. तसेच चेक क्लिअरिंग प्रक्रियेतही अडथळे येण्याची शक्यता आहे.

 

 

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची चेकलिस्ट

 

25 सप्टेंबरपूर्वी शाखेत जाऊन करावी लागणारी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करा.

आवश्यक असलेल्या रोख रकमेची आधीच ATM किंवा ADWM द्वारे सोय करून ठेवा.

खात्यामध्ये पुरेसे पैसे शिल्लक ठेवा जेणेकरून EMI आणि SIP ऑटो-डेबिट बाऊन्स होणार नाही.

ऑनलाईन व्यवहारांसाठी UPI आणि नेट बँकिंगचा वापर करा.

केवायसी, चेक प्रोसेसिंग आणि कागदपत्रांशी संबंधित कामे आधीच उरका.

एखाद्या बँकिंग कामाची अंतिम तारीख 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान असेल, तर ते काम वेळेआधीच पूर्ण करा.

UPI, YONO, नेट बँकिंग सुरू राहणार?

 

प्रस्तावित संपाचा मुख्य फटका हा प्रत्यक्ष बँक शाखांमधील सेवांना बसणार आहे. SBI सह सर्व बँकांनी ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, YONO मोबाईल ॲप आणि UPI यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. या ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, मोबाईल व लाईट बिल भरणे आणि इतर सर्व दैनंदिन व्यवहार विनाअडथळा पूर्ण करता येतील.

 

EMI, क्रेडिट कार्ड बिलांचे काय होणार?

 

बँक संपामुळे तुमचे EMI किंवा क्रेडिट कार्डचे बिल भरणे थांबणार नाही. ग्राहक UPI, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा इतर डिजिटल पर्यायांचा वापर करून आपले पेमेंट वेळेत पूर्ण करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे EMI, SIP किंवा कोणत्याही ऑटो-डेबिट प्रक्रियेसाठी खात्यात पुरेशी शिल्लक असणे आवश्यक आहे. जर कोणत्याही बिलाची अंतिम तारीख या संपाच्या काळात असेल, तर ती शेवटच्या क्षणापर्यंत न थांबवता आधीच भरणे योग्य ठरेल.

 

 

नेमके काय आहे बँक संपाचे कारण?

 

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) मुख्यत्वे आठवड्यात 5 दिवसांची बँकिंग व्यवस्था (5-Day Work Week) लागू करण्याची मागणी केली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात (पेन्शन) सुधारणा करणे, सर्व पेन्शनधारकांसाठी समान महागाई भत्ता (DA) फॉर्म्युला लागू करणे आणि एनपीएस (NPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत (OPS) समाविष्ट होण्याचा पर्याय देणे, यांसारख्या विविध मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -