देशातील नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या सदस्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता पीएफच्या नियमांमध्ये काही नवे बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने आता प्रॉव्हिडंट फंडवर कर (Tax) आकारणी सुरुवात करणार आहे. येत्या एक एप्रिलपासून PF खात्यावर कर आकारण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितले, नवीन आयकर नियमाबाबत सरकारने गेल्या वर्षीच अधिसूचित केले होते. त्यानुसार आता PF खाते दोन भागात विभागले जाणार आहेत. PF खात्यात वर्षाला अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त अधिक रक्कम अर्थात एंप्लॉयी कॉन्ट्रिब्यूशनवर कर आकारण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून नवा नियम लागू करण्यात येणार आहे. उच्च उत्पन्न असलेल्या नोकरदार वर्गाला सरकारी कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यापासून रोखणे, या यामागील उद्देश असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु सरकारी कर्मचारी आणि ज्या कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात कंपनीकडून पैसे जमा केले जात नसतील त्यांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर सूट मिळणार असल्याचीही माहिती देखील त्यांनी दिली आहे.