ICC महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरोधात विजयाचा आपला सिलसिला कायम राखला आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान सामना युद्धापेक्षा कमी नसतो. याची भारतीय महिला संघाला कल्पना होती. त्यामुळे आज त्यांनी त्याच दर्जाचा उत्तम खेळ दाखवला. भारतीय महिला संघाच्या वादळापुढे पाकिस्तानी महिला संघाचा निभावच लागला नाही. भारतीय संघाने तब्बल 108 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने विजयासाठी 245 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण पाकिस्तानचा डाव अवघ्या 137 धावांमध्ये आटोपला. भारतीय आणि पाकिस्तान महिला संघामधील हा 11 वा वनडे सामना होता. भारतीय महिलांनी आपला रेकॉर्ड कायम ठेवला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला नमवण्याची ही दहावी वेळ आहे.
या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, हा सामना संपल्यानंतर स्टेडियममध्ये अशी दृष्य पाहायला मिळाली, ज्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांची मनं जिंकली.
पाकिस्तान महिला संघाची कर्णधार बिस्मह मारुफची मुलगी अवघ्या 6 महिन्यांची आहे. ती तिच्या मुलीला घेऊन न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. मारूफ आपल्या मुलीला मांडीवर घेऊन मॅच खेळण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली. सामना संपल्यानंतर भारतीय संघाची फिरकीपटू एकता बिश्त बिस्मा मारूफच्या मुलीसोबत ड्रेसिंग रुममध्ये खेळताना दिसली. त्यानंतर भारतीय महिला खेळाडू बिस्माहशी गप्पा मारताना तिच्या लहान मुलीशी खेळताना दिसल्या. या दृष्यांनी क्रिकेटरसिकांची, प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तानातील चाहत्यांची मनं जिंकली.
या खास क्षणांचा एक व्हिडीओ माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये कैफने म्हटलं आहे की, युद्ध आणि सीमेवरील तणावाच्या या वातावरणात ही दृष्य शांतता आणि आशेचं प्रतीक आहेत. स्त्रिया हुशार असतात हे माहीतच होतं.