पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. आता यामध्ये नाशिकमधून मुकुंद जगन्नाथ सूर्यवंशी (वय 23) याला अटक करण्यात आली असून 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घोटाळ्यातील एक आरोपी राजेंद्र सोळुंके आणि मुकुंद सूर्यवंशी हे दोघेही एकाच गावचे राहणारे आहेत.
मुकुंद हा नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधला रहिवासी आहे. जी. ए. सॉफ्टवेअरचा प्रीतीश देशमुख याने इतरांशी संगनमत करुन तब्बल 7 हजार 880 अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र केले होते. त्यातील एका एजंटकडील तब्बल 1 हजार 126 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. त्या 7 हजार 880 अपात्रांपैकी सर्वाधिक 2 हजार 770 अपात्र परीक्षार्थी नाशिक विभागातले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते.त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक अश्विनीकुमार याला देण्यात आले.
सुखदेव डेरे, तुकाराम सुपेला किती पैसे मिळाले?
जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक अश्विनीकुमार याने टीईटी 2018 मधील 600 ते 700 परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला दिले. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे याला 20 लाख रुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास 30 लाख रुपये दिले होते.
संतोष हरकळ याच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये 1 हजार 270 परीक्षार्थींची नावे, सीटनंबर, जात अशी नोंद असलेली एक्सल शीट प्राप्त झाल्याची माहिती आहे. या 1 हजार 270 परीक्षार्थींची यादी ही शिक्षण विभागाकडील टीईटी 2019-20 परीक्षेच्या अंतिम निकाल आणि प्रीतीश देशमुख याच्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे कार्यालयाकडून जप्त करण्यात आलेली हार्डडिस्कची तांत्रिक विश्लेषणाद्वारे पडताळणी पूर्ण झाली आहे. अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी गुण वाढविल्याची यादीमधील कोण कोणत्या परीक्षार्थींना मुकुंद सूर्यवंशी याने केला होता संपर्क, सूर्यवंशी शिवाय आणखी कोण एजंट आहेत, याचा तपास सुरू आहे.