मोबाईल चोरीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला शिवीगाळ करीत दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शरणाप्पा भीमराव कांबळे (रा. आलिशान कॉलनी) या संशयितावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस सुहास मधुकर पोतदार यांनी दिली आहे.
पोलिसाला मारहाण केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी कांबळे याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले, पोतदार हे येथील लक्ष्मी मंदिर येथे मंगळवारी दुपारी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील तपास करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे एका चहाच्या दुकानासमोर कांबळे हा मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ करीत होता. दगड फेकत होता. पोतदार यांनी त्याला “विनाकारण आरडाओरडा करून शिवीगाळ का करीत आहेस”, असे विचारले. त्यावेळी कांबळे याने त्यांना शिवीगाळ करून दगड फेकून मारला. त्यात पोतदार जखमी झाले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी कांबळे याला पकडून चोप दिला.
त्यानंतर पोलिसाच्या ताब्यात दिले. पोलिस कर्मचार्यास मारहाण, शिविगाळ आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा कांबळे विरोधात दाखल करून अटक करण्यात आली आहे.पोतदार गणवेशात होते. तरी सुद्धा कांबळे याने त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. काही दिवसांपूर्वी येथील खणभाग येथे महिला पोलिसाला जमावाने शिवीगाळ आणि धक्काबुकी केली होती. त्याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.