ताजी बातमी ऑनलाईन टीम
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सुरु असलेल्या भ्रष्ट्राचारावरुन जोरदार हल्लाबोल केलाय. विधानसभेत त्यांनी मुंबईला नेमकं लुटतंय कोण? याचा पाढाच वाचून दाखवला आहे. कोविड कंत्राट देण्यावरुन झालेल्या घोटाळ्यावरुन त्यांना शिवसेनेवर थेट निशाणा साधलाय. मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात सुरु आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांना टीका केली आहे. ‘आम्ही बोललो तर आम्ही मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाचे शत्रू’ असं हिणवलं जात असल्याचा आरोप त्यांनी विधानसभेत बोलताना केला आहे. दरम्यान, आता मात्र प्रत्येकाला मुंबईचा शत्रू कोण आहे, हे लक्षात आलं आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली आहे. कोण प्रेताच्या टाळूवरचं लोणी खातंय? हे आता सगळ्यांना कळलंय, असंही फडणवीस यांनी विधानसभेत (Maharashtra Assembly Session) बोलताना म्हटलंय.
कोविड सेंटरचं काम कुणाकुणाला दिली गेली, त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केलाय. कोविड केअर सेंटरचा चांगली नावं देऊन किंवा प्रतिष्ठीत कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नावं देऊन काम देण्यात आल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केलाय. इतकंच काय तर पाच कोविड सेंटरच्या 100 कोटींची कंत्राटं ही पदाधिकाऱ्यांच्याच नातेवाईकांना देण्यात आली असल्याचा हल्लाबोल फडणीसांनी केलाय.
कोविड सेंटर घोटाळ्यावरुन सभागृहाचं लक्ष वेधून घेताना फडणवीसांनी म्हटलंय की,…
‘अनुभव नसलेल्या लोकांना काम द्यायचं. त्या ठिकाणी रुग्ण आला की नाही त्याला 50 टक्के रक्कम दिली गेली. कारण, आपल्याच कुणालातरी कोविड सेंटर देण्यात आली होती. दादा तुम्ही पुण्यातून 15 दिवसांत हाकललं. त्यांनाच मुंबईत 5 कोविड सेंटरचं कंत्राट देण्यात आलं. पण त्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही.’
दरम्यान, मुंबईतीतल मुलुंड कोविड सेंटरचं काम घाईघडबडीत देण्यात आल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. आपल्याच एकाच्या आशा कॅन्सर ट्रस्टला ही कामं देण्यात आल्याचंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलंय. या सगळ्यांची कुठे नोंदच नसल्याचाही सनसनाटी आरोपही फडणवीसांनी केलाय. महिन्याभरातच त्यांची पोलखोल झाली आणि महिन्यात त्यांचं कंत्राट रद्द झालं, असा आरोपही फडणवीसांनी केलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या आरोपामुळे आता शिवसेना आणि मुंबई पालिकेतील भ्रष्ट्राचाराचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनीही यावरुन सनसनाटी आरोप केले होते. कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा विषय आता आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी तापण्याची चिन्ह असून यावर आता मुख्यमंत्री नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे कोविड सेंटर घोटाळ्यावरुन शिवसेनाला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.