ताजी बातमी ऑनलाईन टीम
इंधनासह अन्य आवश्यक वस्तूंच्या महागाईमुळे त्रासलेल्या जनतेच्या त्रासात आता आणखी भर पडणार आहे. केंद्र सरकारने अधिसूचित औषधांच्या (शेड्यूल्ड ड्रग्ज) किमती वाढवण्यास मंजुरी दिल्यामुळे डोकेदुखी-तापासारख्या नेहमीच्या दुखण्यांवर वापरले जाणारे पॅरासिटामॉल, अन्य वेदनाशामके व प्रतिजैविकांसह सुमारे 800 अत्यावश्यक औषधे 10 टक्क्यांपेक्षा अधिक महाग होणार आहेत. ही दरवाढ तात्काळ म्हणजे एप्रिलपासून अमलात येणार असल्याने औषधोपचारांवरील खर्च आणखी वाढेल. कोरोनावर वापरली जाणारी काही औषधेही महाग होणार आहेत.
नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथोरिटीने 2021 या कॅलेंडर वर्षासाठी घाऊक किंमत निर्देशांकात मागील वर्षाच्या तुलनेत 10.7 टक्के वाढ जाहीर केली. परिणामी अत्यावश्यक औषधांच्या यादीतील 800 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासूनच 10.7 टक्क्यांनी वाढतील. महाग होणार्या औषधांमध्ये पॅरासिटामॉल, अॅझिथ्रोमायसिन, सिप्रोफ्लॉक्सॅसिन हायड्रोक्लोराईड, मेट्रोनायडाझोल, फेनबिर्बिटोन, फेनायटॉईन सोडियम आदींचा समावेश आहे. ही औषधे ताप, जंतुसंसर्ग, त्वचाविकार, हृदयविकार, अॅनिमिया, उच्च रक्तदाब व अन्य आजारांवरील उपचारांत वापरली जातात.
गेल्या दोन वर्षांत अत्यावश्यक औषधांच्या किमती 15 टक्के ते 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पॅरासिटामॉल 130 टक्क्यांनी महागले आहे. सिरप, ओरल ड्रॉप्स आणि अन्य द्रवरूप औषधे-जंतुनाशकांमध्ये वापरल्या जाणार्या ग्लिसरिन, पॉलिप्रॉपिलीन ग्लायकॉल आदी द्रावणांचे दर तब्बल 83 टक्के ते 263 टक्क्यांनी वाढल्याची माहिती एका संकेतस्थळाने औषधनिर्माण उद्योगातील तज्ज्ञांच्या हवाल्याने दिली आहे. त्यात नवीन दरवाढीमुळे एप्रिलपासूनच शेड्यूल्ड औषधे 10.7 टक्के महाग हाणार आहेत.