ताजी बातमी ऑनलाइन टीम
इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना झाला. मुंबई इंडियन्सचा या सामन्यात पराभव झाला. टीमचा सिनियर प्लेयर कायरन पोलार्ड या सामन्यात कमाल दाखवू शकला नाही. अखेरच्या हाणामारीच्या षटकात मुंबई इंडियन्सला विजयाची गरज होती, तेव्हा कायरन पोलार्ड खेळपट्टीवर होता.
कायरन पोलार्डसाठी राजस्थान रॉयल्स विरुद्धचा हा सामना फारसा चांगला ठरला नाही. गोलंदाजी करताना त्याने चार षटकात 46 धावा दिल्या. फक्त कॅप्टन संजू सॅमसनचा विकेट घेतला.
पोलार्डने टाकलेलं 17 व षटक मुंबईसाठी महागड ठरलं. त्याच्या या ओव्हरमध्ये 26 धावा लुटल्या गेल्या. शिमरॉन हेटमायरने या ओव्हरमध्ये पोलार्डची गोलंदाजी फोडून काढली. दोन षटकार, दोन चौकारांशिवाय लेग बायमधूनही एक चौकार आला.
गोलंदाजी मध्ये पोलार्डकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यानंतर फलंदाजी करतानाही तो चमक दाखवू शकला नाही. पोलार्डकडून वेगवान धावांची अपेक्षा होती. पण तो फेल ठरला. पोलार्डने 24 चेंडूत 22 धावा केल्या. या दरम्यान त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.
मुंबई इंडियन्सने पोलार्डला 6 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. पोलार्डचा जगातील सर्वोत्तम टी 20 क्रिकेटपटूंमध्ये समावेश होतो. मुंबई इंडियन्ससाठी तो अनेक मॅच विनिंग डावही खेळला आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने या सामन्यात शतकी खेळी साकारली.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 193 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने फक्त 170 धावा केल्या. 23 धावांच्या मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला.