गेल्या पाच महिन्यांपासून आझाद मैदानावर (Aazad Maidan) आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) शुक्रवारी आक्रमक होत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांच्या घरावर संतप्त आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 107 जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्याविरोधात देखील कारवाई केली. पोलिसांनी सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक (Adv. Gunaratna Sadavarte Arrested) करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावाला भडकवणे, कट रचणे या गुन्ह्याअंतर्गत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आधी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानावरुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर गावदेवी पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली आहे. अटकेनंतर सदावर्ते यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तब्बल चार तास त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘पोलिसांनी मला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे. माझ्या पत्नीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. माझ्या जीवाला धोका असून माझी हत्या होऊ शकते. याला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जबाबदार असतील, असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.