देशभरात उष्णतेची लाट आली आहे. अनेक राज्यात तापमानाने मोठा उच्चांक गाठला आहे. पुढील काही दिवसांत उष्णता आणखी वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तापमानाचा पारा 50 अंशावर देखील जाऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन हवामान विभागाने दिले आहे. उष्माघातावर उपाययोजना करण्याबाबत केंद्र सरकारने राज्यांना महत्त्वाच्या सूचना देखील जारी केल्या आहेत.
उष्माघाताने 25 जणांचा मृत्यू
राज्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात उष्माघाताने 25 नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील 11 आणि जळगाव जिल्ह्यातील 4 जणांचा समावेश आहे. उष्माघाताने बळी गेलेल्याची गेल्या 8 वर्षांतील उच्चांकी नोंद आहे. दरम्यान, 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. ही गंभीर बाब आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून उष्माघाताबाबत सतर्क राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यांनी केंद्राच्या गाईडलाईन्सचं पालन करावे, नॅशनल अॅक्शन प्लॅनवर लक्ष केंद्रीत करावे, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
राज्यांच्या आरोग्य मंत्रालयांनी उष्माघाताबाबत नियमावली तयार करावी. आरोग्य सुविधा वाढवाव्या, उष्माघात कक्ष उभारावे. उष्माघाताशी संबंधित औषधीचा साठा ठेवावा. त्यात सलाईन, आईसपॅक, ओआरएस, पेयजल यांचा पुरेसा पुरवठा करावा, अशा सूचना देखील केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत.
विदर्भात सर्वाधिक तापमान…
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात तापमानाचा पारा वर चढला आहे. विदर्भात सध्या बहुतांश भागात पारा 45 अंशांच्या पुढे आहे. अशातच राज्यात गेल्या दोन महिन्यात उष्माघातामुळे 25 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक 44 टक्के मृत्यू झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात 11 जणांचा तर जळगाव जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपले…
राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहाणार असताना अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात काही जिल्ह्यांना रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. वर्धा,अमरावतीत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील भाजीपाला, आंबा, लिंबासह पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
पुढील दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.